कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- मराठा आंदोलनाची धग आता कोल्हार भगवतीपूर येथे पोहोचली आहे. येथील सकल मराठा समाजाच्यावतीने मनोज जरांगे यांच्या उपोषणास पाठींबा देत मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत सुमारे आठ जण आमरण उपोषणाला बसले आहेत.
कोल्हार भगवतीपूर येथील भगवतीमाता मंदिराच्या प्रांगणात कालपासून सुसंवाद मंचचे अध्यक्ष जितेंद्र खर्डे यांच्यासह आठ जण आमरण उपोषणास बसले आहेत. अंतरवाली सराटी येथे गेल्या दहा दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी कोल्हार भगवतीपूर येथे सकल मराठा समाजाने आता आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे.
जितेंद्र विष्णुपंत खर्डे, किरण शिवाजी राऊत, नितीन दत्तात्रय खर्डे, अभय नंदकिशोर खर्डे, सुरेश भीमाशंकर पानसरे, सोमनाथ जयवंत खर्डे, अमोल साहेबराव खर्डे, संकेत दिपक कापसे आदींनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
या आंदोलनास शिवसेना ठाकरे गटाचे अनिल बांगरे, शिवकुमार जंगम तसेच मॉर्निंग ग्रुप, रयत सेवक संघटना, विद्यार्थी प्रतिनिधी मनोज कडू व अनेक संघटना पाठिंबा देत आहेत. यावेळी कोल्हारचे माजी सरपंच ऍड. सुरेंद्र खर्डे उपोषणस्थळी उपस्थित होते. सदर आमरण उपोषणाच्या प्रति लोणी पोलीस स्टेशन, कोल्हार व भगवतीपूर ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना देण्यात आल्या आहेत.
आमचे उपोषण कुणा एका राजकीय पक्षविरोधी नसून मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी आहे. रास्तारोको अथवा गांव बंद ठेऊन आम्हाला सर्वसामान्य जनतेस वेठीस धरायचे नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू राहील. प्रत्येक सरकार मध्ये ७० टक्के मराठा नेते आहेत त्यांचेही लक्ष वेधण्यासाठी व मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी हे उपोषण असल्याचे जितेंद्र खर्डे यांनी सांगितले.