सोलापूर, दि.८ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-सामर्थ्यशाली भारताच्या उभारणीत तरुण पिढीचे महत्व व भूमिका खूप मोठी आहे. परंतु ही तरुण पिढी तंत्रज्ञानाच्या महाजालात वेढलेली असून यांना सकारात्मक तंत्रज्ञानाची दिशा दाखवण्याचे काम शिक्षकवर्गांने अत्यंत सक्षमपणे पार पाडले पाहिजे, असे आवाहन महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित सन 2020- 21, 2021-22 व 2022- 23 या तीन वर्षाच्या जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री श्री. विखे पाटील मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, शिक्षणाधिकारी(प्रा.) प्रसाद मिरकले, शिक्षणाधिकारी(मा.) महारुद्र नाळे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, शहाजी पवार, नरेंद्र काळे, शशिकांत चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध विभाग प्रमुख व पुरस्कारार्थी शिक्षक उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. विखे पाटील पुढे म्हणाले की, नव भारताच्या उभारणीत सकारात्मक तंत्रज्ञानावर आधारित तरुण पिढी घडविण्यासाठी शिक्षकांची जबाबदारी मोठी आहे. आजच्या तरुण पिढीसमोर समाज माध्यमाचे व त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीचे फार मोठे आव्हान आहे. यातून तरुण वर्ग गुन्हेगारीशी संबंधित घटनाना लवकर बळी पडत आहेत. या तरुण वर्गाला अशा घटना पासून दूर ठेवण्याची जबाबदारी शिक्षण व्यवस्थेवर येऊन पडलेली आहे. समाज माध्यमांमुळे उत्कर्ष होऊ शकतो व अधोगतीही होऊ शकते, त्यामुळे कशाचा स्वीकार करायचा याबाबत तरुणांना जागृत करण्याची भूमिका शिक्षकांनी घ्यावी, असेही त्यांनी सुचित केले.
प्राथमिक शिक्षण हाच शिक्षण व्यवस्थेचा पाया असून पारंपरिक शिक्षणाच्या पुढे जाऊन आदर्श व संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक वर्गाकडून होत असते. हाच आदर्श विद्यार्थी पुढे जाऊन समाजाच्या उत्कर्षाच्या प्रक्रियेत मोठी जबाबदारी पार पाडत असतो. त्यामुळे शिक्षक हा फक्त विद्यार्थीच घडवत नाही तर समाजाला सुद्धा घडवण्याचे व दिशा देण्याचे काम त्यांच्याकडून अविरतपणे होत असते. शिक्षक वर्ग समर्पित भावनेने काम करून समृद्ध व ज्ञानाधिष्टित पिढी घडवत असल्याने अशा सर्व शिक्षकांना पुरस्काराच्या रूपाने प्रोत्साहन देण्याचे काम होत असते व पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या जबाबदारीत अधिक वाढ होत असते, असे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगून पुरस्कार प्राप्त झालेल्या सर्व शिक्षकांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदनही केले.
सध्याचे युग हे डिजिटल युग आहे असे म्हटले जाते. अशा डिजिटल युगात सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा डिजिटल करण्याबाबत जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा असे पालकमंत्री विखे पाटील यांनी सुचित केले. तसेच पुढील काळात शाळांमधून विद्यार्थ्यांची गळती होणार नाही. यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, कामगार वर्गातील असतात. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांची शाळेतून गळती होऊ नये यासाठी विशेष लक्ष ठेवावे व त्यांना मुख्य प्रवाहात आणावे, असेही त्यांनी सुचित केले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आव्हाळे यांनी पुरस्कार प्राप्त सर्व आदर्श शिक्षकांना शुभेच्छा देऊन पुढील काळात ही त्यांच्याकडून उत्कृष्ट ज्ञानदानाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. मिराकले यांनी केले. यावेळी त्यांनी प्राथमिक शिक्षक विभागाच्या वतीने लोकसहभागातून प्राथमिक शिक्षण विभागाने सात ते आठ कोटीचा निधी जमवून शाळांचा शैक्षणिक विकास केल्याची माहिती दिली. तसेच चट्टोपाध्याय 118 शिक्षक लाभाचे आदेश लवकरच वितरित करण्यात येत असल्याचेही सांगितले.
प्रारंभी राज्यगीत गायनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन झाले, त्यानंतर दीप प्रज्वलन करून पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मागील तीन वर्षातील आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.