कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- कोल्हार भगवतीपूर येथील सकल मराठा समाजाच्यावतीने मनोज जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा व मराठा आंदोलनादरम्यान महिला व पुरुष यांच्यावर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ आमरण उपोषण सुरू आहे. या आमरण उपोषणास सर्वसामान्यांपासून ते विविध सामाजिक व राजकीय संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. दरम्यान आ. सत्यजित तांबे व डॉ. राजेंद्र पिपांडा यांनी येथील उपोषणकर्त्यांची समक्ष भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
आमरण उपोषणाचा काल शुक्रवारी दुसरा दिवस होता. कोल्हार भगवतीपूर येथील भगवतीमाता मंदिराच्या प्रांगणात गुरुवारपासून सुसंवाद मंचचे अध्यक्ष जितेंद्र खर्डे यांच्यासह सुरेश पानसरे, किरण राऊत, नितीन खर्डे, अभय खर्डे, सोमनाथ खर्डे, अमोल खर्डे, संकेत कापसे हे आठ जण आमरण उपोषणास बसले आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे गेल्या दहा – बारा दिवसांपासून मराठा समाजाचा आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा तसेच पोलिसांनी महिला – पुरुषांना केलेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ कोल्हार भगवतीपूर येथील सकल मराठा समाजाच्यावतीने आरक्षणासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
आ. सत्यजित तांबे यांनी कोल्हार भगवतीपूर येथील उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, राज्य सरकारने न्यायालयात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला द्यावे. त्याचप्रमाणे गरजवंत मराठा समाजास या आरक्षणाचे फायदे मिळावेत अशी मागणी करत त्यांनी कोल्हार भगवतीपूर येथील आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा व्यक्त केला. याशिवाय डॉ. राजेंद्र पिपाडा यांनीदेखील येथे समक्ष येऊन येथील उपोषणकर्त्यांची भेट घेत जाहीर पाठिंबा दिला.
याशिवाय कोल्हार भगवतीपूर येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणास गावातील व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचा व विविध सामाजिक, राजकीय संघटनांचा पाठिंबा वाढत चालला आहे. कोल्हार भगवतीपूर येथील मुस्लिम समाजाने या उपोषणास जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. काल येथील अशरफी फाउंडेशन, अखिल भारतीय सुवर्णकार समाज राज्य फेडरेशन असोसिएशनच्यावतीने पाठिंबा देण्यात आला.