माळवाडगाव( जनता आवाज वृत्तसेवा ):- आगामी गणेशोत्सवात सर्व स्तरातील समाज घटकांनी सौहार्दपणे सहभागी होऊन शांतता व उत्साहाच्या वातावरणात व पर्यावरणपूरक साजरा करावा असे आवाहन श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक डॉ.बसवराज शिवपुंजे यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीच्या बैठकीत केले. तसेच या उत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्यांसाठी एक खिडकी सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर पोलीस स्टेशन येथे गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते डीजे चालक-मालक आणि पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुंजे होते. यावेळी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे पोलीस उपनिरीक्षक निकम गोपनीयचे अनिल शेंगाळे व तालुक्यातील गणेशोत्सव मंडळाचे सदस्य व अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते.
यावेळी सर्व मंडळाच्या सदस्यांनी गणेशोत्सव दरम्यान मंडळाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवणे, दररोज एकाच स्वयंसेवकाची मंडळाच्या ठिकाणी नेमणूक करणे, मिरवणुकीची पूर्वपरवानगी घेणे, अधिकृत रित्या वीज पुरवठा घेणे, मिरवणुकी दरम्यान कोणाच्याही सामाजिक भावना दुखावणार नाही याची दक्षता घेणे याबाबत सर्व गणेशोत्सव मंडळांना सूचना देण्यात आल्या. उपस्थितांचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी आभार व्यक्त केले.