श्रीगोंदा ( जनता आवाज वृत्तसेवा ):-आ.बबनराव पाचपुते यांनी कार्यकर्त्यांच्या जीवावर सर्व संकटांवर मात करत तालुक्याच्याच नाही तर जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान दिले असल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी बोलताना सांगितले.माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांच्या वाढदिवसानिमित्त आ.बबनराव पाचपुते यांच्या सपत्नीक सत्कारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काष्टी येथे आयोजित राष्ट्रीय वयोश्री योजना आणि दिव्यांग साहित्याचे देखील वाटप करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्याच्या विकासाच्या आराखड्यात ज्या चार पाच जणांनी योगदान दिले त्यांच्यात आ.बबनराव पाचपुते यांचे नाव पुढे येते. आ.पाचपुते यांनी आपल्या माध्यमातून अनेक लोकांना मोठे केले. जिल्ह्याच्या विकास कामात त्यांनी प्रामुख्याने रस्त्यांच्या बाबतीमध्ये कोणीच न पाहिलेले स्वप्न म्हणजे काष्टी जामखेड रस्त्याचे काम केले. हा रस्ता जवळपास पूर्ण होत असून एका तासात जामखेड काष्टी रस्त्याने आता जाता येणार आहे, लिंपणगाव रेल्वेगेट वरील उड्डाणपुलासाठी ६० कोटी रुपये मंजूर केले आहे. येत्या १५ दिवसात या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. अवघ्या एका वर्षात हे काम पूर्ण करणार असल्याचे सांगत तालुक्याचा विकास हा आश्वासनांचा नसून डोळ्याने दिसणारा असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील वयोश्री योजना आणि दिव्यांग साहित्य वाटप हे आ.पाचपुते यांनी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय दिला असल्याने त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी वाटप करण्याचे आयोजित केले असल्याचे खा.विखे यांनी बोलताना सांगितले. पीक पाहणीसाठी कालावधी थोडा राहिला असून या योजनेत कोणताच शेतकरी मागे राहू नये या साठी येत्या दहा दिवसात तालुक्यातील राहिलेल्या शेतकऱ्यांची पीक पाहणी करून घेणार असल्याचे यावेळी बोलताना सांगत राजकरण करीत असताना काही लोक फक्त अंत्यविधी, दशक्रिया विधी, लग्न सोहळे , साखरपुडा, वर्ष श्राद्ध यासाठी दिवसदिवस घालवतात मात्र मी तसे न करता दिल्लीत बसून कामे मंजूर करून घेतो आणि विकास कसा करता येईल याचे नियोजन करतो . आम्ही भाजप बरोबर काम करत असून आमदार बबनराव पाचपुते यांच्या बरोबर आहोत काही झाले तरी पाचपुते यांच्या खांद्याला खांदा लावून विखे कुटुंब तुमच्या बरोबर आहे असे ही खा सुजय विखे यांनी सांगितले.
भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय समाज कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाना आधार देऊन त्यांचा स्वाभिमान वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यासाठी संपूर्ण भारतात निःशुल्क साहित्य वाटप करण्यात येत आहे . दिव्यांग व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही त्यांनी नाराज न होता नाव नोदणी केल्यावर त्यांना ही लाभ देण्यात येईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी केले.
यावेळी नागवडे कारखान्यांचे माजी उपाध्यक्ष केशव मगर, डॉ.प्रतिभा पाचपुते, भगवानराव पाचपुते, ॲड.प्रतापसिंह पाचपुते, गौरी शुगरचे चेअरमन बाबुराव बोत्रे, अरुण पाचपुते, बाळासाहेब महाडिक, मिलिंद दरेकर , सिद्धेश्वर देशमुख, सचिन कातोरे, गणेश झिटे, जिजाबापू शिंदे , बापूशेठ गोरे ,संग्राम घोडके ,अशोक खेंडके, सुनील वाळके, शहाजी खेतमाळीस,ॲड.महेश दरेकर, भाजपचे शहर अध्यक्ष राजेंद्र ऊकांडे,श्रीकांत मगर, यांच्यासह तालुक्यातील ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य सेवा संस्थेचे चेअरमन व संचालक यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.



