शेवगाव ( जनता आवाज वृत्तसेवा ):-सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता भाजपाच्या वतीने प्रत्येक गावात ई-पिक पाहणी करण्यासाठी शेतक-यांना मदत केली जाणार असून कुठलाही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचीत राहणार नाही याची दक्षता आम्ही घेणार असल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
शेवगाव तालुक्यातील आव्हाणे बुद्रुक येथील स्वयंभू निद्रिस्त गणपती मंदिरामध्ये आयोजीत कार्यक्रमामध्ये विखे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार मोनिका राजळे, भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंढे, वृध्देश्वरचे उपाध्यक्ष रामकिसन काकडे, तहसीलदार प्रशांत सांगडे, गटविकास अधिकारी राजेश कदम, सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता प्रल्हाद पाठक, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना खा.विखे म्हणाले की सत्ता ही विकासासाठी असते हे राज्यातील व केंद्रातील सरकारने दाखवून दिले आहे. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघातील गेल्या ३० वर्षाचा विकास कामाचा अनुशेष आम्ही गेल्या एक वर्षाच्या कालावधीत भरुन काढण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी वर्षभरात मतदार संघाचे रस्ते व विजेचा प्रश्न मार्गी लावणार आहोत, त्यामुळे विकासासाठी विचार वेगळे असले तरी सर्वपक्षीयांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमधून तालुक्यातील ६ कोटी ५० लाख रुपये कामांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करताना आज आनंद होत असल्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगताना या परिसरातील विजेच्या समस्या ह्या येत्या आठवड्याभरात पूर्ण करण्याचे आपण प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले. राज्यात गतिमान सरकार असून आमदार मोनिकाताई राजळे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे विविध प्रश्न मार्गी लागत असून जिल्हा नियोजन समितीतून डी पी साठी साधारण दीड कोटी रुपये निधी राखीव असतो तो वाढवून १५ ते २० कोटी रुपये पर्यंत वाढविण्याचा निर्णय झाला आहे. तालुक्यातील ५३ हजार हेक्टर क्षेत्राचा ४० हजार शेतकऱ्यांनी पिक विमा उतरविला असून नुकसान भरपाई साठी लवकरात लवकर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे यावेळी सांगितले.
शेवगाव ते पांढरीपूल या चौपदरी रस्त्याचे काम येत्या सहा महिन्यात सुरु होईल असेही त्यांनी सांगितले.
या शुभारंभ कार्यक्रमात आ.मोनिकाताई राजळे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक बाळासाहेब कोळगे यांनी तर सुत्रसंचालन कचरु चोथे यांनी केले.अर्जुन सरपते यांनी आभार मानले.
कार्यक्रमास बाळासाहेब कोळगे, बापुसाहेब पाटेकर, तुषार पुरनाळे, अमोल सागडे, विजय कापरे, देवस्थानचे अध्यक्ष मालोजी भुसारी, मिना कळकुंबे, उमेश भालसिंग, चंद्रकांत गरड, भिमराज सागडे, संदीप वाणी, राम कोळगे, अनिल खैरे यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
विविध कामाचा शुभारंभ
शेवगाव तालुक्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून ३ कोटी ६१ लाख ४४ हजार खर्चून हिंगणगाव ते देवटाकळी रस्ता डांबरीकरण करणे ३ कोटी ६१ लाख ४४ हजार, वाघोली ते माका रस्ता डांबरीकरण (३० लाख ), वडूले बुद्रुक ते पानसंबळवस्ती रस्ता डांबरीकरण (३० लाख ), बालमटाकळी ते मुरमी रस्ता डांबरीकरण (३० लाख ), दिंडेवाडी फाटा ते ज्योतीबा चौफुली रस्ता डांबरीकरण ( ३० लाख ), बालमटाकळी ते कांबी रस्ता डांबरीकरण ( ७० लाख ) , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत बालमटाकळी येथे माँडेल स्कूल बांधकाम करणे ( ५९ लाख ), प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत आव्हाणे बु. येथील स्वयंभू निद्रीस्त गणपती देवस्थान सभामंडप ( ५० लाख ) या विविध कामांचा शुभारंभ खा.डॉ.सुजय विखे पाटील व आ.मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते करण्यात आला.




