श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ): –जागतिक पातळीवरील बा जारपेठेचा आणि मागणीचा अभ्यास करुन महिलांनी गृहोद्योग व्यवसाय विकसित करावा असे प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र तसेच जिद्द सोशल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी शासकीय मसाला मेकिंग कोर्सच्या कार्यक्रमाचे उदघाटन श्री.मुरकुटे यांच्या हस्ते संपन्न झाला.
श्रीरामपूर तालुक्यातील महिलांना स्वतःचा नवीन उद्योग सुरु करावा या हेतूने ११ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मसाला मेकिंग कोर्सचे आयोजन जिद्द सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजुश्रीताई मुरकुटे व सेजल उद्योग समूहाचे संस्थापक जितेंद्र तोरणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. कोर्स करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी तात्यासाहेब जिवडे, इन्स्पेक्टर खैरनार, बार्टी प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे सिनिअर मॅनेजर अभिनव कुमार, पंचायत समितीचे महिला बचत गट प्रभाग समन्वयक शुभांगी माळी, अशोक कारखान्याचे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीताताई गायकवाड, कारखान्याचे संचालक प्रफुल्ल दांगट, ट्रेनर विद्याताई क्षिरसागर, अशोक बॅंकेचे संचालक रणजित बनकर, कारेगाव भागचे व्हा.चेअरमन शिवाजी मुठे, संचालक दत्तात्रय पटारे, संजय लबडे आदी उपस्थित होते.
देशांतर्गत व जागतिक बाजारपेठेत स्पर्धाक्षम होण्यासाठी लघु उद्योग व्यावसायिकांनी जागतिक पातळीवरच्या बाजारपेठा आणि वाढलेली स्पर्धा याचा अभ्यास करुन महाराष्ट्र हे मसाले उद्योगांमध्ये अव्वल रहावे, यासाठी सर्व महिलांनी एकत्र येऊन या समृद्धीच्या उद्योग व्यवसायाला चालना द्यावी, असे आवाहन श्री.मुरकुटे यांनी यावेळी केले.
मसाला उद्योग व्यवसायाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून जितेंद्र तोरणे यांनी सेजल उद्योग समूहच्या वतीने माल खरेदी करून मोठ्या मॉल व दुकानांना पुरवठा करणार आहे. लोकांची मानसिकता आणि गरज ओळखून व्यवसाय विकसित करुन राज्यातील लघु उद्योग व्यावसायिकांनी विक्री व्यवस्था आणि बाजारपेठ यावर भर द्यावा. या लघु उद्योग धोरणामध्ये नवीन उद्योग उभे राहतील आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल. तसेच या माध्यमातून महिलांना व्यवसायाची सर्व माहिती उपलब्ध होणार असल्याचे सौ.मंजुश्री मुरकुटे यांनी सांगितले.
यावेळी बचत गटातील महिलांनी बँकेचे कर्ज प्रकरण कसे करावे तसेच नवनवीन उद्योग, प्रॉडक्स विक्री, पैकींग, जाहिरात याबाबत सखोल माहिती देण्यात आली. तसेच प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या अनुसुचित जाती व जमातीच्या महिलांना शासनाकडून १ हजार रुपयाचे अनुदान प्राप्त होणार आहे. याप्रसंगी परिसरातील महिला, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



