श्रीरामपूर(जनता आवाज
वृत्तसेवा ):- भारतीय स्वातंत्र्य लढ्यात थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच’ अशी सिंह गर्जना करत भारतीय जनतेच्या मनात स्वराज्याची भावना रुजवली. तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी महत्त्वाचे योगदान दिल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक मा उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले आहे.
श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती प्रसंगी ससाणे बोलत होते. ससाणे पुढे म्हणाले की अनेक वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत राहिलेल्या भारतीय जनतेच्या मनात प्रखर राष्ट्रवाद, देशप्रेम व स्वराज्याची भावना निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य लोकमान्य टिळकांनी केले. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती व सार्वजनिक गणेशोत्सवांच्या माध्यमातून जनतेला स्वराज्य मिळवण्याची स्फूर्ती दिली. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून लोकप्रबोधन, राजकीय क्रांती आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले. आपले विचार आणि कार्य यांच्या माध्यमातून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी लोककलेला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांनी आपल्या साहित्यातून शोषितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडल्या. याप्रसंगी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मा.नगराध्यक्ष संजय फंड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, मा नगरसेवक दिलीप नागरे आदी मान्यवर उपस्थित होते.