श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):- लोकशाहिर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्वातंञ्य संग्राम तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान अविस्मरणिय आहे. त्याचप्रमाणे त्यांचे साहित्य हे सामाजिक प्रबोधन करणारे आहे, असे प्रतिपादन मुळा-प्रवरा वीज संस्थेचे संचालक सिध्दार्थ मुरकुटे यांनी केले.
भारत राष्ट्र समितीच्या (बी.आर.एस.) वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी श्री.मुरकुटे बोलत होते. श्री.मुरकुटे म्हणाले की, अण्णाभाऊ हे लोकशाहिर होते. आपल्या शाहिरीच्या माध्यमातून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकजागरण केले. ते भारतरत्न डाॕ.आंबेडकरांच्या विचारांचे पाईक होते. त्यांचे साहित्य सामाजिक प्रबोधन करणारे होते. त्यांच्या पुस्तकांचे अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली. याप्रसंगी अशोक बँकेचे चेअरमन अॅड्.सुभाष चौधरी, नाना पाटील, रोहन डावखर, राजेंद्र कंत्रोड, सेनेचे सचिन बडदे, यासीन सय्यद, पत्रकार मिलिंदकुमार साळवे, संदीप डावखर, पुंडलिक खरे, निखिल पवार आदिंसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच अशोक साखर कारखाना कार्यस्थळावरही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे कार्यकारी संचालक संतोष देवकर, कार्यालय अधीक्षक विक्रांत भागवत, लेबर ऑफिसर अण्णासाहेब वाकडे, विलास लबडे, संतोष जाधव आदी उपस्थित होते.