नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा):- नेवासा येथे तरुणांना ज्ञानेश्वरी वाचन करता यावे यासाठी पसायदान प्रतिष्ठाणच्या माध्यमातून दि ८ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या कालावधीत श्री ज्ञानेश्वरी पारायण आयोजित करण्यात आले होते त्याची सांगता काल बैलपोळ्याच्या दिवशी सामुहिक पसायदानाने करण्यात आली.
शहरातील तरुणांनी आध्यात्मिक प्रगती करावी यासाठी ज्ञानेश्वरी पारायण सारखे दुसरे माध्यम नाही परंतु इच्छा असतानाही वेळ व कामाच्या व्यापामुळे तरुण पिढीला ज्ञानेश्वरी वाचन करता येत नाही म्हणुनच नेवासा शहरातील तरुणांच्या वेळेचे भान ठेवत हभप उद्धवजी महाराज नेवासकर यांच्या मार्गदर्शनाखाली व हभप अंकुश महाराज जगताप यांच्या सहकार्याने पसायदान प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी पारायण आयोजित केले होते रोज सकाळी ६ ते सकाळी ९ वाजेपर्यंत ३ तास ज्ञानेश्वरी वाचन करण्यात आले या पारायणमधे २१ तरुणांनी सहभाग नोंदवला होता, यावर्षी अल्प कालावधीमधे नियोजन केले असतानाही अनेक तरुणांनी पारायणासाठी सहभाग घेतला.
ही आनंदाची बाब असून पुढील वर्षी मोठ्या स्तरावर तरुणांनी पारायणासाठी बसावे यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहोत असे पसायदान प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मनोज पारखे यांनी सांगितले तसेच परमार्थ हा फक्त जेष्ठ माणसांनीच करायचा आहे असं सर्वांना वाटतं पण या तरुणांनी परमार्थात अशी कामगिरी करून एक अतिशय चांगला पायंडा पाडला आहे आणि पुढील वर्षी अधिक अधिक तरुणांनी या पारायण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कृष्णा डहाळे यांनी सांगितले .
“इवलेसे रोप लावियेले द्वारी । त्याचा वेलू गेला गगनावरी । या माऊलींच्या वचनाप्रमाणे या थोड्या संख्येने सुरु झालेल्या सोहळ्यास अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळेल,” या शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक अशोकराव कल्पवृक्ष यांनी पसायदान प्रतिष्ठाणच्या कार्यास शुभेच्छा दिल्या सप्ताह यशस्वी पार पाडण्यासाठी कचरू राजगिरे, सचिन भांड, शिवा मोरे, महेश भुसारे, आदित्य बोरुडे, मनोज हापसे, राजेश उपाध्ये आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.