अहमदनगर ( जनता आवाज वृत्तसेवा):-येत्या सहा ऑगस्ट रोजी शासन आपल्या दारी हे अभियान शिर्डी येथे संपन्न होत असून या अभियानाची जनजागृती गावागाव पर्यंत पोहचावी अशा सूचना महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शासन आपल्या दारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी सिद्धाराम सलिमाठ, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश येरेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.बी.लांगोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सहा ऑगस्ट रोजी होणाऱ्या शासन आपल्या दारी अभियानाचा आढावा घेताना त्यांनी आरोग्य व्यवस्था,भोजन व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, या बरोबरच विविध विभागांचा सखोल आढावा घेतला. यात प्रामुख्याने कार्यक्रमाच्या दिवशी लाभार्थ्यांना कार्यक्रम स्थळी व्यवस्थित आणून परत त्यांना त्यांच्या गावी सोडणे यावर चर्चा केली. यात काही अडचणी येत असल्यास त्या सोडविण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना केली याचीही माहिती घेतली. या बैठकीत एकवीस विभागाचा आढावा घेण्यात आला. वाहतुकीसाठी एकूण 616 बसेसची व्यवस्था करण्यात आली असून तीस हजारा पेक्षा जास्त लाभार्थी कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
शासन आपल्या दारी या अभियाना बाबत जनजागृती ही गावागावात पोहचविण्यासाठी ग्राम पंचायती पासून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात फ्लेक्स, होर्डिंग्ज, तसेच सर्व सामाजिक माध्यमाद्वारे याची प्रसिध्दी करावी असे त्यांनी यावेळी सांगितले.
इतर जिल्ह्यात ज्या पद्धतीने या अभियानास व्यापक स्वरूप मिळाले त्याच पद्धतीने आपल्या जिल्ह्यात देखील हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना केले.