जामखेड ( जनता आवाज वृत्तसेवा ):-संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसुचीत जमाती (एस.टी. प्रवर्ग) आरक्षणासाठीचा वटहुकुम काढावा या मागणीसाठी यशवंतसेनेच्या वतीने श्रीक्षेत्र चोंडी येथे गेली १० दिवसापासून चालु असलेल्या आमरण उपोषणाची दखल घेण्याबाबत आमदार प्रा राम शिंदे हे संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र देणार आहेत.
आमदार शिंदे यांनी दिलेल्या पत्रात १७ ते २२ सप्टेंबर २०२३ या पाच दिवसाच्या संसदेच्या विशेष अधिवेशनात धनगर समाजाला अनुसुचीत जमाती मध्ये आरक्षण अमलबजावणीचा वटहुकुम काढला जावा व यासाठी महाराष्ट्र सरकारने पाठपुरावा करावा. या मागणीसाठी बी.के. कोकरे प्रणीत यशवंत सेनेच्या वतीने ६ सप्टेबर २०२३ पासुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी स्मारकास्थळी उपोषणकर्ते बाळासाहेब दोडतले, माणिकराव दांगडे, अण्णासाहेब रूपनवर व सुरेश बंडगर व इतर आमरण उपोषण करत असून, याठिकाणी रोज शेकडो समाज बांधव आंदोलनात सहभाग घेवून पाठींबा देत आहेत.
दरम्यान या आमरण उपोषणाची राज्य सरकारने अद्याप दखल घेतली नसल्याने,धनगर समाजामध्ये याप्रश्री तीव्र भावना आहेत. त्याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत.रास्ता रोको , आमरण उपोषण, धरणे आंदोलने राज्यभर होत आहे.
धनगर आरक्षणप्रश्री चोंडी येथे गेली १० दिवसापासून आमरण उपोषण करणा-या उपोषणकर्त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. यासंदर्भात उपोषणकर्त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी राज्य सरकारकडून तात्काळ योग्य ती दखल घेण्यात यावी असे आमदार शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे.