कोळपेवाडी ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- जिल्हा क्रीडा संचालनालय, अहमदनगर व गौतम पब्लिक स्कूल, गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धा गौतम पब्लिक स्कूलच्या प्रशस्त हॉकी मैदानावर (दि. १५) रोजी शुभारंभ झाला. शाळेचे प्राचार्य नुर शेख यांनी स्पर्धेचे उद्घाटन करून स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडू व प्रशिक्षकांना शालेय व्यवस्थापन व गौतम परिवारातर्फे उत्कृष्ट खेळासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पुणे विभागातील विविध संघातील खेळाडू, प्रशिक्षक, गौतम पब्लिकचा शिक्षकवृंद, सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. तत्पूर्वी प्रास्ताविक पर बोलतांना मुलींच्या पुणे शहर संघाच्या संघ व्यवस्थापक लिनेट मॉस म्हणाल्या की, गौतम पब्लिक स्कूल महाराष्ट्रातील खेळाचे माहेरघर असून गौतमच्या मातीत अनेक राष्ट्रीय खेळाडू घडत आहे. खेळासाठी शाळेचे शालेय व्यवस्थापन म्हणून संस्थेचे विश्वस्त आ. आशुतोष काळे, सचिव सौ. चैतालीताई काळे, प्राचार्य नुर शेख व क्रीडा विभाग पूरक वातावरण निर्माण करत असल्याची माहिती दिली.
या स्पर्धा दि. १५ व १६ सप्टेंबर दरम्यान गौतम पब्लिक स्कूलच्या मैदानावर पार पडणार आहे. सदर स्पर्धेत पुणे विभागातील अहमदनगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील मुला-मुलींचे १५ व १७ वर्ष वयोगटातील एकूण १५ संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या गौतम पब्लिक स्कूलच्या सब-जुनियर संघाने सेंट जोसेफ पुणे शहर संघाचा २-० असा पराभव केला. गौतम पब्लिक स्कूलचा सब-जुनिअर हॉकी संघ राज्यस्तरीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली. गौतमच्या विजयी संघाचे संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे, विश्वस्त आ. आशुतोष काळे, सचिव सौ. चैतालीताई काळे सर्व संस्था सदस्य, प्राचार्य यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचा समारोप सोहळा दि. १६ सप्टेंबर रोजी संस्थेचे विश्वस्त आ.आशुतोष काळे व संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती प्राचार्य नुर शेख यांनी दिली.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा संचालनालय अहमदनगर व प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, फुटबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, क्रिकेट व व्हॉलीबॉल प्रशिक्षक इसाक सय्यद आदी परिश्रम घेत आहेत.