कुकाणे (जनता आवाज वृत्तसेवा):- सत्ता गेल्याने वैफल्यग्रस्त विरोधक मोदींना पर्याय शोधत असले तरी कितीही आघाड्या होऊ द्या जनता मोदींच्याच पाठीशी आहे कारण मोदींचे कामच ते सांगते.लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न शासन आपल्या दारी या उपक्रमातून केला जात असल्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. कुकाणे येथे आज शासन आपल्या दारी या उपक्रमात मंत्री विखे यांनी जनतेचे प्रश्न समजून घेत मार्गदर्शन केले.
वैफल्यग्रस्त विरोधक पर्याय शोधीत असले तरी जनता मोदींच्या पाठीशी- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, नितीन दिनकर, जिप माजी सदस्य तेजश्री लंघे, कुकाणे सरपंच लता अभंग भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, अंकुश काळे, बाळासाहेब कोलते, ज्ञानेश्वरचे संचालक देसाई देशमुख आदी
व्यासपिठावर उपस्थित होते. मंत्री विखे म्हणाले, कोविड काळात मोफत लस देणारा जगातला क्रांतीकारी निर्णय प्रधानमंत्र्यांनी घेतला. लोक कामासाठी सरकारच्या दारात हेलपाटे मारत पण आम्ही लोकांची कामे होण्यासाठी लोकांच्याच दारात शासन जाणार हा उपक्रम हाती घेतला यातून लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.अजित पवारांच्या प्रवेशाने आणखी उमदीने काम करता येणार असून विविध उपक्रमांतून जनतेचे प्रश्न सोडवणार आहोत. सततच्या पावसाचे 38 कोटी व अतीवृष्टीचे 45कोटी मी प्रयत्नातून नेवासे तालुक्यास दिले. गेल्यावेळी मतदारांनी चूक केली, त्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले,पूर्वी एक दिवसाचा महसूल दिन उपक्रम होता आता येत्या शेतकऱ्यांच्या व जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट असा महसूल सप्ताह राबवला जाणार असून नगरला जिल्हा स्तरावर मंत्री विखे यांच्या कल्पनेतून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे उपस्थितीत प्रथम कार्यक्रम घेतला जाणार आहे.सरकारी योजनानापासून कोणी वंचित राहिले असल्यास त्या त्या तालुक्याच्या तहसीलदारांशी संपर्क करा असे आवाहनही त्यांनी केले.
माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विठ्ठलराव लंघे यांचीही प्रारंभी भाषणे झाली. नगर प्रांतधिकारी सुधीर पाटील शेवगावचे पोलीस उपाधीक्षक सुनील पाटील,नेवासे तहसीलदार संजय बिरादार गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर, वैधकीय अधिकारी अभिराज सूर्यवंशी पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे आदी यावेळी उपस्थित होते.
तलाठीही लोकांपर्यंत -संजय गांधी योजना प्रकरणे, घरकुल प्रकरणात आता लाभार्थ्यांनी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्यापेक्षा तलाठीच लाभार्थ्यांन पर्यंत पोहोचणार आहे. तलाठ्याने याकामासाठी लोकांना बोलावून घ्यायचे नाही तर लोकांपर्यंत त्यानेच जाऊन कागदपत्रे घ्यायाची असे मंत्री विखे यांनी सांगितले. चौकट -दहा मिनिटात शेत होणार मोजून -मोजणीचे प्रलंबित अर्ज त्वरित निकाली काढा असा आदेशच मंत्री विखे यांनी दिला. आता अत्याधुनिक साधनाद्वारे अवघ्या दहा मिनिटात शेत जमिनीची मोजणी होणार असून त्यातील गैरप्रकारांना यामुळे आळा बसणार आहे.




