नगर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-अहमदनगर जिल्ह्याचे भविष्य हे विद्यार्थी असून आपण उच्च शिक्षण घेवून आपल्या जिल्ह्याचा विकास करावा अशा शुभेच्छा खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी देवून स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच वातानुकूलित आधुनिक तंत्रज्ञानने परिपूर्ण असे ग्रंथालय उभा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अहमदनगर येथील सामाजिक न्याय भवन येथे आयोजित जेईई,एनईईटी,एमएचटी-सीईटीच्या विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाज्योतीच्या वतीने टॅब वाटप करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अहमदनगरचे आ.संग्राम भैय्या जगताप,माजी महपौर बाबासाहेब वाकळे,उपसंचालक डॉ.भगवान वीर, उपायुक्त समाज कल्याण राधाकिसण देवढे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ते म्हणाले की अहमदनगर जिल्ह्यातील तरुण पिढी ही खूप सक्षम आहे, जिल्ह्याला पुढील 25 वर्षे विकासाच्या दिशेने नेणारी असून या पिढीच्या सर्वांगीण विकासा करिता आपण सदैव कटिबद्ध आहोत. या विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आपण आराखडा तयार केला असून या आराखड्या नुसार लवकरच स्पर्धा परिषेची तयारी करण्यासाठी 15 कोटी रुपये खर्च करून अद्यावत तसेच आधुनिक तंत्रज्ञाने परिपूर्ण असे ग्रंथालय उभा करणार असल्याचे सांगून सर्व सामन्याच्या घरातील मुले या ठिकाणी आपले भविष्य घडविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अहमदनगर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे असलेल्या औद्योगीकरणासाठी एमआयडीसी ही मंजूर करून घेतली असून डी झोन मध्ये ही एमआयडीसी मंजूर केली असल्याने आपल्या कडे नवीन उद्योग आता लवकरच येणार आहेत, आपण काही उद्योजकांशी संपर्कात असून ते त्यांचे प्लान्ट आपल्य कडे सुरू करतील असे सांगताना पुढील २५ वर्षे रोजगार निर्मितीचे उद्दिष्टे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अहमदनगर महानगराचे विस्तारीकरण लक्षात घेता सावेडी येथे विस्तारीत बस स्थानक करणार असल्याचे खा.विखे यांनी सांगताना विखे पाटील कुटुंबियांच्या वतीने 300 विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मोफत क्लासेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगताना यासाठी लवकरच टिचिंग अकादमी सुरू करणार आहोत असे सांगितले. दिलेला शब्द पाळणारे आमचे कुटुंबिये असून मागील पन्नास वर्षा पासून समाजकारणात,राजकारणात यामुळेच आहोत. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही हे कार्य सातत्याने करत असून पुढे ही असेच कार्य करणार असल्याचे याप्रसंगी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमात आ.संग्राम भैय्या जगताप यांचे समयोचित भाषण झाले.तर दोन विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी उपस्थित विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप खासदार, आमदार,यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त समाज कल्याण राधाकिसण देवढे यांनी केले.
या कार्यक्रमास विद्यार्थी,पालक,पदाधिकारी, भाजपा नगरसेवक,आधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.



