7.2 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

शब्द हे शस्त्र आहे ; शब्दाचे घाव भरत नाही : महंत रामगिरी कोल्हार भगवतीपूर येथे ७ दिवस भक्तिरसाचा धबधबा वाहला

कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- शब्द जपून वापरावेत. शब्द हे शस्त्र आहे. एक वेळ शस्त्राने मारलेला घाव भरून निघू शकतो, परंतु शब्दरूपी शस्त्राचा घाव कधीच भरून निघत नाही. दुर्योधनाचा झालेल्या शब्दरूपी अपमानामुळे महाभारताचा रणसंग्राम घडल्याचे गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांनी सांगितले. 
कोल्हार भगवतीपूर येथे बुधवारी श्रीमद् भागवत कथेचे सातवे आणि अखेरचे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. भगवतीदेवी मंदिराच्या भव्य प्रांगणामध्ये दररोज रात्री ७ ते १० या वेळेत श्रीमद् भागवत कथा सुरू होती. कोल्हार भगवतीपूरमध्ये झालेला हा ज्ञानेश्वरी पारायण आणि श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा सर्वार्थाने ऐतिहासिक ठरला. कथा श्रावणासाठी आसपासच्या तालुक्यातून येणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे दररोज महाकाय सभामंडप खच्चून भरलेला असायचा. शेवटच्या कथेदरम्यान कृष्ण, रुक्मिणी, सुदामा यांचा हृदयस्पर्शी जिवंत देखावा पाहताना भाविकांनी हे रोमांचकारी दृश्य  प्रत्यक्ष अनुभवले. कोल्हार भगवतीपूर ग्रामस्थांनी अत्यंत सुनियोजित पद्धतीने केलेल्या या सोहळ्याचे रामगिरी महाराजांनी तोंडभरून कौतुक केले.
भगवान  श्रीकृष्णाच्या आठ पत्न्यांबद्दल सांगताना महाराज म्हणाले, रुक्मिणी स्वयंवरानंतर श्रीकृष्णाला प्रद्युम्न नावाचा एक पुत्र झाला. स्यमंतक मणी मिळविण्यासाठी कृष्णाने दुसरा विवाह जामवंतीशी केला. तिसरा विवाह सत्यभामा, चौथा कालिंदी, पाचवा नेत्रविंदा, सहावा सत्या, सातवा भद्रा आणि आठवा विवाह लक्ष्मणा हिच्यासंगे केला. भोमासुराने सोळा हजार एकशे राजकन्या कारावासात बंदी केल्या होत्या. श्रीकृष्णाने भोमासुराचा वध करून या राजकन्यांची मुक्तता केली. त्या राजकन्यांनी कृष्णासोबत विवाहाची गळ घातल्यानंतर  तसेच त्यांना आश्रय देण्यासाठी कृष्णाला त्यांच्याशी विवाह करावा लागला. अशाप्रकारे श्रीकृष्णाच्या आठ पट्टराण्या आणि सोळा सहस्त्र बायका होत्या. 
श्रीकृष्ण – रुक्मिणी संवाद  सांगताना  महाराज म्हणाले, भगवान परमात्मा सर्वव्यापी आहे. भक्ताच्या हृदयरूपी सागरात भगवंत वास्तव्य करतात. भगवंताशिवाय भक्त राहू शकत नाही. जगाचा पिता परमेश्वर आहे मात्र त्याचा पिता कोणीच नाही. 
भगवान कृष्ण पांडवांच्या राजसूय यज्ञात जातात. त्यावेळी जरासंधाचा पराभव करण्यासाठी अर्जुन आणि भीमाला ब्राह्मणांचा वेश धारण करीत सोबत नेतात. जरासंधाचे भीमासोबत २८ दिवस गदायुद्ध चालते. कृष्णाच्या सांगण्यावरून भीम जरासंधाचे दोन तुकडे करतो व दोन विरुद्ध दिशांना फेकतो. असा जरासंधाचा वध होतो. त्याच्या कारागृहातील सर्व राजांना मुक्त केले जाते. दरम्यान पांडवांनी निर्माण केलेल्या इंद्रप्रस्थमध्ये दुर्योधन पाण्यात पडल्यावर द्रौपदी हसते. आंधळ्याचा पुत्र आंधळा असे म्हणते. याचा दुर्योधनाला प्रचंड राग येतो. येथूनच कौरव – पांडवांच्या युद्धाची ठिणगी पडते. भरसभेत द्रौपदीला नग्न करण्याची यावेळी दुर्योधन शपथ घेतो. पुढे द्युत खेळलं गेलं. पांडवांना वनवासात जावं लागलं. कुणाचाही अपमान करू नये असा उपदेश  करीत महाराज म्हणाले, शिशुपालाने कृष्णाचा अपमान केला म्हणून कृष्णाने सुदर्शनचक्राने त्याचा शिरच्छेद केला. 
वसुदेव देवकीच्या इच्छेनुसार श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावर राजसूय यज्ञाचे आयोजन करतात. तिथे गोकुळातून यशोदा, नंदराजा श्रीकुष्णाला भेटतात. राधा भेटते. पुढे सुदामाचे चरित्र, कृष्ण – सुदामा संवाद, नारद – प्रल्हाद संवाद, सुभद्रा हरण, भस्मासुराची कथा, दुर्वास ऋषींचा शाप आणि यदुवंशाच्या नाशाचा प्रसंग, वसुदेव – नारद संवाद, जनक – नवयोगेश्वर संवाद. यामध्ये भगवान दत्तात्रेयांनी  केलेल्या असंख्य गुरूंचे प्रसंग वर्णन संक्षिप्तरूपात  सांगताना महाराज म्हणाले, सौंदर्य, तारुण्य, सत्ता अयोग्य व्यक्तीच्या हाती गेल्यानंतर विनाश होतो.
द्वादश स्कंधातील कलियुगाचे गुण सांगताना रामगिरी महाराज म्हणाले, कलियुगात जरी भक्तांची संख्या कमी असली. दिखावा करणारे भक्त जरी अधिक असले तरी कलियुगात भगवंताची प्राप्ती लवकर होते. यात भक्तीचा सोपा मार्ग असून केवळ भगवंताच्या नामस्मरणाने भगवतप्राप्ती होते. अंतःकरणातून भगवंताचे भजन केले असेल तर भगवंत प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही हे कलियुगाचे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हार भगवतीपूरमध्ये पहिल्यांदाच एवढे भव्य नियोजन : अॅड. सुरेंद्र खर्डे
कथेदरम्यान कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच अॅड. सुरेंद्र खर्डे म्हणाले, कोल्हार भगवतीपूर येथे यापूर्वी एवढ्या भव्य स्वरूपाचा धार्मिक सोहळा कधी झाला नाही. कोल्हार भगवतीपूर परीसर, प्रवरा परीसरच नव्हे तर आजूबाजूच्या सर्व तालुक्यातून भाविक या कार्यक्रमासाठी  सात दिवस आवर्जून उपस्थित राहिले. ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे वर्गणी दिल्या. सर्व स्तरातून ज्याला जे जे शक्य होईल ते ते योगदान दिले. अन्नदान केले. त्यामुळे हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी झाला. याबद्दल त्यांनी ग्रामस्थ, शेतकरी, व्यापारी, भाविक यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी पारायण आणि श्रीमद् भागवत कथेप्रसंगी महिलांची जवळजवळ ८० टक्के उपस्थिती राहिली याकडे लक्ष वेधीत त्यांनी विशेषकरून महिलांना धन्यवाद दिले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!