14.7 C
New York
Saturday, October 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

भक्ताच्या चित्ताला आकर्षित करणारा कृष्ण परमात्मा : महंत रामगिरी कोल्हार भगवतीपूरच्या काल्याच्या कीर्तनाला गर्दीचा महापूर

कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा ) :-  जो भक्ताचे हृदय चोरतो, जो भक्ताच्या चित्ताला आकर्षित करतो तो श्रीकृष्ण परमात्मा होय. भक्ताच्या जन्मोजन्मीच्या पापांची चोरी करून त्याला पापमुक्त करतो तो श्रीकृष्ण असल्याचे प्रतिपादन गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांनी केले.
कोल्हार भगवतीपूर येथे सात दिवसापासून सुरू असलेल्या ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या सांगता प्रसंगी काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते. याप्रसंगी श्री भगवती देवीच्या मंदिरासमोर भाविकांच्या गर्दीचा महापूर ओसंडून वाहिला. काल्याच्या कीर्तनात सर्व दंग झाले. त्यानंतर  महाप्रसादाने या सोहळ्याची चैतन्यमय वातावरणात सांगता झाली. या संपूर्ण सप्ताहाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. सकाळी ज्ञानेश्वरी ग्रंथाची पालखीतून ढोल ताशा, सनई चौघड्याच्या गजरात भव्य मिरवणूक निघाली. डोक्यावर तुळशी वृंदावन व मंगल कलश घेऊन माता – भगिनी उस्फूर्तपणे सहभागी झाल्या. दरम्यानच्या काळात  सभामंडपात पाथरे बुद्रुक येथील श्री. पलघडमल यांचा भक्तीगीतांचा कार्यक्रम पार पडला.
रामगिरी महाराज म्हणाले,  आहाराचा शरीरावर आणि मनावर परिणाम होतो. म्हणून ते पवित्र असावे. ज्या अन्नात प्रसन्नता आहे तेच खऱ्या अर्थाने भोजन आहे. भगवंताला नैवेद्य स्वरूपात अर्पण करून जे सेवन केले जाते तो प्रसाद म्हणजे काला होय.
याप्रसंगी  प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे म्हणाले, सात दिवसापासून सुरू असलेल्या ज्ञानेश्वरी पारायणात बहुसंख्य वाचक सहभागी झाले. संध्याकाळच्या सुमारास  महंत रामगिरी महाराजांच्या सुमधुर वाणीतून भागवत कथा श्रवण करण्याचा लाभ असंख्य भाविकांना लाभला. त्यांनी सांगितलेल्या उपदेशाचे आपण सर्वांनी अनुकरण केले तर आपले जीवन सार्थकी लागेल.  बाभळेश्वर येथील सद्गुरू श्री नारायणगिरीजी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी दररोजच्या हरीपाठाची शोभा वाढविली. सुरुवातीला गावात प्रथमच एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे दडपण होते. अपेक्षित खर्च मोठा होता. मात्र गावकऱ्यांनी भरघोस वर्गणीची मदत केली याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे, व्यापाऱ्यांचे आभार मानले. बहुसंख्येने उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी विशेषतः महिलांच्या प्रचंड सहभागाबद्दल आभार मानले.
अॅड. सुरेंद्र खर्डे म्हणाले, १९३३ साली योगीराज गंगागिरीजी महाराज यांचे चौथे उत्तराधिकारी सोमेश्वर गिरी यांचा या गावांमध्ये मोठा सप्ताह झाला होता. आज शंभर वर्षानंतर महंत रामगिरी यांच्या कथेद्वारे पुन्हा भव्यदिव्य असा सोहळा पार पडला. म्हणजेच सरला बेटाशी कोल्हार भगवतीपूरचा शंभर वर्षापासून संबंध असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. एवढा मोठा जनसमुदाय रामगिरी महाराजांच्याबद्दल असलेल्या श्रद्धेमुळे एकत्रित आला. महिलांच्या उस्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. सर्वांनी हिरीरीने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. देणगीदारांनी भरभरून वर्गणी दिली याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे, उपाध्यक्ष साहेबराव दळे, सर्व विश्वस्त मंडळ, कोल्हार बुद्रुकच्या सरपंच सौ. निवेदिता बोरुडे, उपसरपंच सौ. सविता खर्डे, भगवतीपूरचे सरपंच दत्तात्रय राजभोज, उपसरपंच प्रकाश खर्डे, विखे कारखान्याचे संचालक स्वप्निल निबे, धनंजय दळे, भगवतीपूरचे माजी सरपंच रावसाहेब खर्डे, लहानू राऊत, ऋषिकेश खांदे, पंढरीनाथ खर्डे, अजित मोरे, विजय डेंगळे, अमोल थेटे, श्रीकांत बेद्रे, केतन लोळगे, अक्षय मोरे, अजय निबें, अरुण फोपसे आदि उपस्थित होते. कीर्तनाला लोणी खुर्द ग्रामपंचायतच्या सदस्या सौ. प्रभावतीताई घोगरे, राहाता येथील डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी भेट देत कीर्तन श्रवण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ महाराज म्हस्के यांनी केले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!