नगर (जनता आवाज वृत्तसेवा):- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व अहमदनगर जिल्हा विभागीय क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा दिनांक १६ आणि १७ सप्टेंबर रोजी आयोजित केलेली असून या स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्ह्यामधून जवळपास १२ विद्यार्थी खेळाडू संघ आणि ८ खेळाडू विद्यार्थिनींचे संघ असे एकूण २० संघ सहभागी झालेले आहेत.
या क्रीडा स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे आणि पंच म्हणून लाभलेले एन. आय. एस. चे नॅशनल कोच मा. डॉ. किरण पवार सर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या सुरुवातीला स्पर्धेच्या अटी व नियम सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून सांगितल्या. खेळ हा शतकानुशतके मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग असून खेळ हा विद्यार्थ्यांसाठी एकत्र येण्याचा, स्पर्धा करण्याचा आणि त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा विकास करण्याचा एक मार्ग आहे, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे सर यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयातील क्रीडा विभागाच्या वतीने क्रीडा समन्वयक प्रा. अविनाश हंडाळ सर यांच्या नियोजनाखाली आयोजित या स्पर्धांसाठी कोपरगाव, संगमनेर, शेवगाव, राहुरी, नगर शहर, श्रीरामपूर, बेलापूर, लोणी, इत्यादी नगर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयामधून कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, औषध निर्माण इत्यादी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. या कार्यक्रमास अहमदनगर जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव डॉ. राजेंद्रकुमार देवकाते तसेच क्रीडा संचालक डॉ. सुभाष देशमुख, डॉ. शांताराम साळवे, डॉ. विजय मस्के डॉ. शरद मगर, डॉ. बाळासाहेब शिंदे, डॉ. नितीन वाळुंज, आदी क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी सिव्हील विभागाचे प्रमुख प्रा. पी. जी. निकम, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख प्रा. एस. एम. वाळके, प्रथम वर्ष समन्वयक डॉ. एम. के. भोसले, कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विभाग प्रमुख प्रा. व्ही. व्ही. जगताप, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. ए. बी. काळे यांचे सहकार्य लाभले. टेबल टेनिस स्पर्धेच्या उद्घाटन समारंभचे सूत्रसंचालन छत्रपती अभियांत्रिकी द्वितीय वर्षाचा विद्यार्थी ओंकार कांडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मेकॅनिकल विभागाचे प्राध्यापक अक्षय देखणे यांनी केले.



