बेलापूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या दूरदृष्टीतुन देशभर विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असुन त्याची प्रभावी अंमलबजावणी राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे जलशक्ती मिशन योजना असुन त्या अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्याला ४ हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.२०२४ पर्यंत प्रत्येक घराला नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. बेलापूरच्या या १२६ कोटींच्या पाणी योजनेमुळे गावाची पुढील ३०-३५ वर्षांची पाण्याची अडचण दुर होणार आहे. अशा विविध योजनांमुळे सर्वसामान्यांना उभारी देण्याचे काम होत आहे. शासनाच्या विविधांगी योजना राबवून गाव व तालुक्याचे भवितव्य आज आणि उद्या आपणच घडविणार आहोत, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी केले.
जलशक्ती योजनेंतर्गत जिल्ह्याला ४ हजार कोटी-महसूलमंत्री विखे पाटील; बेलापुर – ऐनतपुरच्या पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ
केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत बेलापुर – ऐनतपुर गावच्या १२६ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ ना. विखे पा. यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिर्डीचे शिवसेना खा. सदाशिव लोखंडे होते. काँग्रेस आ. लहू कानडे, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा.नाईक,भाजपचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर,उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, तालुकाध्यक्ष दीपक पटारे, सुनिल मुथा आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ना. विखे पुढे म्हणाले की, निसर्गाच्या लहरीपणा व दुष्काळी परिस्थिती यातुन शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकारने अवघ्या एक रुपयात पीकविमा उतरविण्याचा निर्णय घेतला.जिल्ह्यातील ५ लाख ९१ हजार शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. तसेच १६ हजार शेतकऱ्यांना १४ कोटींचे अनुदान मंजूर केले आहे. दुधाला ३४ रुपये लिटर भाव देण्याचे सरकारचे धोरण असुन जो दुध संघ हा भाव देणार नाही त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल होणार आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली कोरोनाच्या काळात देशातील सर्वांचे मोफत लसीकरण, त्यानंतर बुस्टर डोस देऊन ८० कोटी लोकांना आजपर्यंत मोफत धान्य पुरविणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला आहे.श्रीरामपूर तालुक्याचे भवितव्य आज आणि उद्या आपणच घडविणार आहोत असा ठाम विश्वास व्यक्त करीत केंद्र आणि राज्यातील सरकार हे खऱ्या अर्थाने जनतेच्या मनातील सरकार असल्याने दररोज या सरकारचा जनाधार वाढतच आहे, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात खा. सदाशिव लोखंडे यांनी केंद्राच्या जलशक्तीसह विवीध योजनांची माहिती देत निळवंडेच्या धरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ५३ वर्षांनी न्याय मिळाल्याचे स्पष्ट केले. आ. लहुजी कानडे म्हणाले की,योजना होतात तरी काही ठिकाणी पाणी मिळत नाही अशी अवस्था आहे. बेलापुर पाणी योजनेला ना. विखेंनी केलेल्या विशेष सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. या योजनेचे दर्जेदार काम होण्यासाठी प्रथमपासुन कामावर लक्ष ठेवण्याची सूचनाही कानडे यांनी केली.
जि. प. सदस्य शरद नवले यांनी गावात सर्वात मोठी पाणी योजना होण्यासाठी ना. विखेंनी केलेल्या विशेष सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच गावात स्पर्धा परीक्षा केंद्र, बचत गट भवन, आवास योजनेसाठी सहकार्य करण्याची विनंती केली. सरपंच महेंद्र साळवी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर उपसरपंच व बाजार समिती उपसभापती अभिषेक पा. खंडागळे यांनी प्रास्ताविक भाषणातून अद्यावत पोलीस स्टेशनसह ग्रामविकासाच्या विवीध कामांची मागणी केली.
यावेळी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पा. व पद्मभूषण खा. बाळासाहेब विखे पा. यांच्या प्रतिमांचे ना. विखे यांच्यासह उपस्थितांनी पुजन केले. ना. विखे पा. यांची पेढेतुला करण्यात आली. योजनेचे भूमिपूजन व कोनशिलेचे उदघाटन ना. विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ना.विखे यांच्यासह सर्वांनी एलईडी स्क्रीनवर पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या ” मन की बात” कार्यक्रम पाहण्याचा आनंद घेतला. तसेच केंद्रीय लोकसेवा आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्या श्री. दिलीप दुधाळ व देविदास देसाई दाम्पत्य या पालकांचा ना. विखे यांनी सत्कार केला.
यावेळी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, प्रांताधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी एस. एम. कदम, एस. आर. वारे, भिमगीरी कांबळे, सुनिल हरदास, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, ग्रामविकास अधिकारी एम.बी.गायकवाड,भाजप किसान आघाडीचे भीमभाऊ बांद्रे, गणेश मुदगुले, बाजार समिती संचालक नानासाहेब पवार, गिरिधर आसने, नानासाहेब शिंदे, नगरसेवक रविंद्र पाटील, बाबासाहेब शेटे, बाजार समिती सचिव साहेबराव वाबळे, जालिंदर कु-हे, रणजित श्रीगोड , व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रशांत लड्डा, शांतीलाल हिरण, जनसेवा पतसंस्थेचे चेअरमन प्रवीण लुंकड, भाऊसाहेब कुताळ, हाजी इस्माईल शेख,,सौ. स्नेहलताई नवले, ग्रा. पं. सदस्या सौ. तब्बसुम बागवान, स्वाती आमोलिक, प्रियंका कु-हे, उज्वला कुताळ, मिना साळवी, चंद्रकांत नवले, मुस्ताक शेख, वैभव कु-हे आदी उपस्थित होते. पुरुषोत्तम भराटे यांनी शेवटी आभार मानले. मिष्ठान्न भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन संतोष मते व देविदास देसाई यांनी केले.




