टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा ):- गणेश उत्साहात वादग्रस्त जागेत गणपती बसवू नये. गणेश मंडळांनी ग्रामपंचायतची परवानगी घ्यावी व पोलीस विभागाची ऑनलाइन परवानगी घेवूनच नियोजित जागेत गणपती बसवावेत व आगामी सण व उत्सव शांततेत साजरे करावेत असे आवाहन श्रीरामपूर तालूका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी केले.
टाकळीभान येथील पोलिस स्टेशनमध्ये गणेश उत्सव व आगामी सणवार निमित्त शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी चौधरी बोलत होते.
यावेळी बोलतांना चौधरी पुढे म्हणाले की, गणेश मडळांनी मंडळाच्या कोपऱ्यावर सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा. तसेच या ठिकाणी जुगार व अवैद्य धंदे चालू नये, रात्रीच्यावेळी मंडळाच्या स्वयंसेवकांनी मंडळा जवळ थांबून मूर्तीची काळजी घ्यावी, मिरवणूकीमध्ये मद्यपान करू नये, भाविक भक्तांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे व या उत्सवा दरम्यान अनुचीत प्रकार घडू नये म्हणून सर्वांनी सावधानता बाळगण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राजेंद्र कोकणे, जयकर मगर यांनी सण उत्सव ग्रामस्थ शांततेत व उत्साहाने साजरे करतात
व यापुढेही सण, उत्सव शांततेत साजरे करण्यासाठी पोलिस प्रशासनास गावाचे सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी ग्रामस्थांच्या वतीने दिली.
यावेळी काँग्रेसचे तालूका उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, अशोक कारखान्याचे संचालक यशवंत रणनवरे, उपसरपंच कान्हा खंडागळे, आबासाहेब रणनवरे, भाऊसाहेब पवार, जयकर मगर, सुनील बोडखे, बापूसाहेब शिंदे, आप्पासाहेब रणनवरे, शरद रणनवरे, सुंदर रणनवरे, मल्हार रणनवरे, पोलिस नाईक अनिल शेंगाळे, बाबा सय्यद आदी उपस्थित होते.




