श्रीरामपूर : ( जनता आवाज वृत्तसेवा):- सराफ व्यवसायिकांच्या दुकानांतील चोऱ्या व लुटमारीच्या तपासाबाबत होत असलेल्या दिरंगाईबाबत आपण स्वतः जातीने लक्ष घालू, असे आश्वासन देऊन, सराफ सुवर्णकारांच्या सुरक्षेसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याचे विचाराधीन असल्याचे राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
श्रीरामपूर तालुका सराफ सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष स्वामीराज कुलथे व गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी पतसंस्थेचे चेअरमन अनिरुद्ध महाले यांनी सराफांच्या प्रश्नांसंदर्भातील निवेदन उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिले. त्यानंतर झालेल्या चर्चेप्रसंगी फडणवीस यांनी हे आश्वासन दिले.
निवेदनात अहमदनगर जिल्ह्यात मागील काही महिन्यांमध्ये अनेक सराफ व्यवसायिकांच्या दुकानांमध्ये धाडसी चोऱ्या झालेल्या असून दरोडे पडेलेले आहेत. तसेच काही व्यावसायिकांना रात्री घरी जाताना बेदम मारहाण करून लुटण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. यातील काही ठिकाणचे आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहेत, परंतु सदर चोरीतील मुद्देमाल आजतागायत व्यापा-यांना परत मिळालेला नाही. श्रीरामपूरमध्ये अनिरुद्ध महाले, सचिन अहिरराव, नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथील प्रल्हाद अंबिलवादे, शेवगाव येथील बलदावा, नगर येथील नवदुर्गा ज्वेलर्स या व्यापाऱ्यांच्या दुकानात झालेल्या चो-यांचा कुठलाही तपास लागलेला नाही तसेच संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील सराफ प्रसाद बोऱ्हाडे नांदुरकर यांच्यावर हल्ला करून रात्रीच्या वेळेस घरी जाताना त्यांना चोरट्यांनी बेदम मारहाण करुन मालाची पिशवी पळवली, याचा तपास पोलिसांना लागला परंतु पोलिसांनी दबावतंत्राचा वापर करून फक्त ७ लाखाची फिर्याद दाखल करुन घेतली.
वास्तविक मुद्देमाल २३ लाखाचा होता आणि पोलिसांना हस्तगत झाला फक्त ७ लाखाचा, परंतु तोही माल अद्याप फिर्यादींना मिळालेला नाही, तसेच ज्याठिकाणी चांदीच्या मालाची चोरी झालेली आहे त्याचा तपास करण्यास पोलिस टाळाटाळ करुन तपास करण्यास आम्हाला वेळ नाही असे सांगून सराफांना आरोपी असल्यासारखी वागणूक देतात. अनेक वेळा या संदर्भात आम्ही जिल्हा पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक, पोलिस निरीक्षक यांना निवेदन देऊन देखील कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही, तरी आपण याकामी जातीने लक्ष घालावे व सराफ व्यापारी बंधूंना न्याय मिळवून द्यावा अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत.



