लोणी दि.२२ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-विद्यार्थ्यांनी सादर केलेले नाविन्यपूर्ण प्रकल्प निश्चितच विद्यार्थ्यांच्या संशोधनास वाव देणारे ठरतील असा आत्मविश्वास या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करतांना लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अतिरिक्त कार्यकारी संचालक डॉ. शिवानंद हिरेमठ यांनी व्यक्त केला.
लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात दोन दिवस विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या विज्ञान प्रदर्शनामध्ये १४ विद्यालये, १३ कनिष्ठ महाविद्यालये व ९ वरिष्ठ महाविद्यालयातील संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन तीनशे नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले आहेत यासाठी ७५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. दोन दिवसात लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध विद्यालयातील आणि महाविद्यालयातील तसेच राहता तालुक्यातील शालेय विद्यार्थी या विज्ञान प्रदर्शनास भेट देणार आहेत.
यावेळी संस्थेचे सहसचिव भारत घोगरे पाटील, संस्थेचे तांत्रिक व अतांत्रिक महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रदीप दिघे यांचेसह विज्ञान प्रदर्शनाचे समन्वयक डॉ. अनिल वाबळे, डॉ राम पवार यांचेसह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विज्ञान प्रदर्शनात शैक्षणिक धोरण २०२० ला अनुसरून विद्यार्थ्यांनी भविष्यकालीन शैक्षणिक उद्दिष्टांचे व धोरणांचे महत्त्व, भारताने नुकतीच चंद्रयान-३ ही मोहीम यशस्वी करून दाखवली त्याविषयीचे ज्ञान, चंद्रावरील वातावरण, तेथील मातीचे नमुने यांची माहिती, आधुनिक उपकरणांसह जैवविविधता, पर्यावरण व माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून अतिशय नाविन्यपूर्ण अशी उपकरणे या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी हे विज्ञान प्रदर्शन उपयुक्त ठरेल असा आशावाद यावेळी सर्वांनी व्यक्त केला. यातून वैज्ञानिक दृष्टिकोन तर वृद्धिंगत होईलच परंतु विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक क्षमता ही विकसित होण्यास मदत होईल असेही या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर लक्षात येते.दोन दिवसीय प्रदर्शनात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजन समितीने केले आहे कार्यक्रमाचे सुञसंचालन डाॅ.वैशाली मुरादे यांनी तर आभार पी,एम.हराळ यांनी मानले.
प्रवरेच्या माध्यमातून सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडवित असतांनाच संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्तकी ज्ञानासोबत विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी आणि माहीती तंञज्ञान आणि बदलत्या भारतासाठी हे विज्ञान प्रदर्शन विद्यार्थीसाठी महत्वपुर्ण ठरत आहे.