वैजापूर( जनता आवाज वृत्तसेवा):- तब्बल दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसाने वैजापूर शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात गुरुवारी रात्री दमदार हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. या पावसामुळे कपाशी व काही प्रमाणात मका पिकांना जीवदान मिळणार आहे. गुरुवारी रात्री साडेआठ वाजता अचानक ढग दाटून आले व पावसाला सुरुवात झाली. जवळपास दीड ते दोन तास हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरण चिंब झाले होते. जानेफळ, लोणी, खंडाळा, बोरसर, लासुरगांव, वैजापूर व घायगाव या सात मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत वैजापूर तालुक्यातील बारा महसूल मंडळात सरासरी ३६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वैजापूर मंडळात ६७ मिमी, खंडाळा मंडळात १०२ मिमी, शिऊर ३५ मिमी, बोरसर १०२ मिमी, लोणी ८१ मिमी, गारज १८ मिमी, लासुरगांव ६९ मिमी, महालगाव ६३ मिमी, नागमठाण ६९ मिमी, लाडगावं ६२ मिमी, घायगाव ६६ मिमी, जानेफळ १६२ मिमी व बाबतरा मंडळात ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाने खंड दिल्याने गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. मोठा पाऊस न झाल्याने वैजापूर तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु काल रात्री झालेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळणार असून मका व कापूस या पिकांना फायदा होणार आहे. आणखी दोन ते तीन दिवस दमदार पाऊस झाल्यास पुढील हंगामातील पिके पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.या पावसामुळे वैजापूर श्रीरामपूर रस्त्यावर इंगळे वस्ती जवळ एक बाभळीचे झाड रस्त्यावर उन्मळून पडले.त्यामुळे वाहतूक विस्कळित झाली.