अहमदनगर ( जनता आवाज वृत्तसेवा):-पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा अंत्योदय विचारांचा वारसा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णयाची अंमलबजावणी करून पुढे घेवून जात आहेत. पंडितजीना अंत्योदय चळवळीच्या माध्यमातून अभिप्रेत असलेल्या सामाजिक विकासाचे प्रतिबंब सुध्दा आत्मनिर्भर भारताच्या निर्णय प्रक्रीयेतून साध्य होताना दिसत असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
अहमदनगर येथे आयोजित पंडित दीनदयाळ उपध्याय यांच्या जयंतीच्या निमित्ताने दीनदयाळ पतसंस्था व दीनदयाळ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.या व्याख्यानमालेच्या उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. रविंद्र साताळकर, दीनदयाळ पतसंस्थेचे संस्थापक श्री. वसंतराव लोढा, चेअरमन श्री. विकास पाथरकर, ज्येष्ठ संचालक श्री. मिलिंद गंधे, दीनदयाळ परिवाराचे अध्यक्ष श्री. धनंजय तागडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना नामदार विखे म्हणाले की सध्याच्या सोशल मीडिया जमान्यात व्याख्यानमाला फारशा होताना दिसत नाहीत. पूर्वी ह्या मोठ्या प्रमाणावर होत असे,अशा व्याख्यानमालेतून ज्ञानार्जन होत असे. त्यात जर व्याख्याते हे अत्यंत विषय तज्ञ असतील तर ती ज्ञानार्जनाची मेजवानीच ठरते. मात्र आता धावपळीच्या या युगात फारसा वेळ कोणाला या करिता काढता येणे थोडे अवघड आहे. त्यातही ऑनलाइन पद्धतीमुळे तर प्रत्येक जण आता मोबाईलवरच आहे. कोरोना काळात ही पद्धत पुढे आली आणि आज ती सर्वत्र रुळली असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना काळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिप्रेत असे गोरगरीब, मजदुर, कामगार, यांच्यासाठी मोठे काम केले. ८०% जनतेला अन्नधान्य हे याकाळात मोफत वाटप केले. हाच अंत्योदयचा दीनदयाळजीचा विचार देशाच्या विकासाशी जोडला गेला असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.
पंतप्रधान मोदीजी यांनी ज्या पद्धतीने गोरगरीब , कामगार, मजदुर यांचा विचार करून त्यांना मोफत धान्य वाटप केले तसेच जी २० या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून भारत देश हा आता महासत्ता होण्याच्या दिशेने आपली वाटचाल करत असल्याचे जगाला दाखवून दिले. मोदी आज विश्वाचे नेते झाले आहेत.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज देश प्रगतशील देशाच्या यादीत अव्वल स्थान प्राप्त करण्यासाठी काम करत असून आपण सर्वांनी यासाठी त्यांना पाठबळ द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारधारेवर काम करण्याची गरज असून यातूनच राष्ट्र समृद्धी साध्य होईल असा आशावाद त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. दीनदयाळ पतसंस्था व दीनदयाळ परिवार हे सातत्याने एक विशिष्ट ध्येयाने प्रेरित होवून अविरत हे कार्य करत असून त्यांच्या या कार्या बद्दल त्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी जेष्ठ मुलाखतकार रजत शर्मा यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थितांशी संवाद साधला. व्याख्यानमालेचे प्रास्तविक वसंत लोढा यांनी केले.
यावेळी सर्व संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



