टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा):- माजी आमदार भानुदास मुरकुटे गटाचे व टाकळीभान ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच अर्चना रणनवरे, सदस्य सुनिल बोडखे व सदस्या लताबाई भाऊसाहेब पटारे यांनी उपसरपंच कान्हा खंडागळे गटाशी युती केल्याने सरपंच, उपसरपंच राजीनामा मागणी नाट्यावर पडदा पडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून टाकळीभान ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती.मात्र नुकताच सरपंच अर्चना रणनवरे व उपसरपंच कान्हा खंडागळे गटाने गावाच्या विकासाच्या मुद्यावर युती केली असून उपसरपंच गटाची सदस्य संख्या ९ झालीअसल्याने सरपंच, उपसरपंच बदलावर पडदा पडला आहे.
मुरकुटे गटाच्या स्थानिक नेत्यांच्या जाचाला कंटाळून गावच्या विकासासाठी उपसरपंच गटाचे समर्थन व युती केल्याचे सरपंच अर्चना रणनवरे यांनी
ग्रामपंचायतच्या स्व. गोविंदराव आदिक सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषेदेत सांगितले. यावेळी बोलतांना सरपंच अर्चना रणनवरे म्हणाल्या की, गावाच्या विकासासाठी उपसरपंच गटाशी युती केली आहे मात्र मी आजही मुरकुटे गटातच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या गटाच्या स्थानिक नेत्यांनी ग्रामपंचायत कामकाजात मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केला त्यामुळे दोन गट झाले त्यामुळे गेल्या दिड वर्षात कोणतेही विकासाचे काम करता आले नाही. मला विचारात न घेता व कोणतीही माहीती न देताच वरीष्ठांकडे माझ्या सरपंच पदाच्या राजीनाम्याची मागणी केली गेली होती व याच नेत्यांनी विकासकामात नेहमीच आडकाठी घातली होती. ग्रामस्थांना गावाच्या विकासासाठी दिलेल्या शब्दाची पुर्तता करण्यासाठी मी अखेर दबाव झुगारुन विकास कामासाठी उपसरपंच गटाचा पाठींबा घेतला असन येणाऱ्या काळात भरीव निधीसाठी प्रयत्न करुन विकासाचा राहीलेला आनुषेश भरुन काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आसल्याचे सरपंच अर्चना रणनवरे यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच कान्हा खंडागळे म्हणाले की, आम्ही नागरिकांना रामराज्याचे स्वप्न दिल्याने मतदारांनी १६-१ च्या फरकाने सदस्य निवडून दिले होते. मात्र विकासाची दृष्टी नसलेल्या आमच्या येथील स्थानिक नेत्यांनी सदस्य मंडळातच दुफळी पाडली त्यामुळे गेल्या दोन वर्षात विकास न झाल्याने माय बाप मतदारांची मी माफी मागतो. मात्र आता मुरकुटे गटाचे सरपंच अर्चना रणनवरे, सदस्य सुनिल बोडखे व लता भाऊसाहेब पटारे यांनी स्थानिक नेत्यांना न जुमानता विकासासाठी देवू केलेले समर्थनाने आता विकासकामे वेगाने केली जातील असे आश्वासन दिले.
आता आमच्या गटाची सदस्य संख्या ९ बहुमतात झाल्याने विकास कामे मार्गी लावण्यासाठी व मतदारांना दिलेले रामराज्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी यापुढील कार्यकाळात प्रयत्न केले जातील.व पुर्ण कालावधीसाठी म्हणजे जानेवारी २०२६ च्या निवडणूकीपर्यंत अर्चना रणनवरे यांना समर्थन असणार असल्याचेही खंडागळे यांनी अवर्जुन सांगितले.
यावेळी प्रा. जयकर मगर, भाजपाचे नारायण काळे, भाऊसाहेब पटारे, बापूसाहेब शिंदे यांनीही चर्चेत भाग घेत विकासाच्या कामाला समर्थन दिले.
यावळी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष राहुल पटारे, युवा नेते भाऊसाहेब पवार, रावसाहेब मगर, आर पी आयचे आबासाहेब रणनवरे, सुधीर मगर, राहुल कोकणे, भागवत रणनवरे, पोपट जाधव, रमेश पटारे, दिगंबर मगर, सुभाष येवले, संतोष पटारे, बाबासाहेब गायकवाड तसेच सरपंच- उपसरपंच गटाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच- उपसरपंच बदलाच्या वेगवान हालचाली सुरु झाल्याने येथील ॲड. दिपक कोकणे यांनी सर्व घटनांवर बारकाईने लक्ष ठेवून सरपंच पती यशवंत रणनवरे, सदस्य सुनिल बोडखे व उपसरपंच कान्हा खंडागळे यांच्यात दिलजमाई घडवून आणून मोलाची गेम चेंजर म्हणून मोलाची भूमिका पार पाडली.
ग्रामपंचायत विरोधी उपसरपंच गटाचे विकास कामासाठी समर्थन घेतले असले तरी आंम्ही मुरकुटे गटाचेच आहोत मात्र आम्ही मुरकुटेंचा दुसरा गट म्हणून कामकाज करणार असल्याचे अशोक कारखान्याचे संचालक यशवंत रणनवरे,सुनिल बोडखे व लताबाई पटारे यांनी सांगितले.