कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा ):- भक्ती अशी असावी की, भगवंताने भक्ताच्या दरवाजाची कडी वाजवावी. भगवंताप्रती प्रेम असेल तर स्वतः भगवंत भक्ताकडे येतो. मात्र ज्या कुळामध्ये सज्जनांचा अपमान होतो, त्या कुळाचा नाश होतो. रावणाने बिभीषणाचा अपमान केला म्हणून रावणाच्या कुळाचा नाश झाला असल्याचे प्रतिपादन गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांनी केले.
कोल्हार भगवतीपूर येथे ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये मंगळवारी कथेचे तिसरे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. रामगिरी महाराज यांच्या सुश्राव्यवाणीतून भगवतीदेवी मंदिराच्या भव्य प्रांगणामध्ये दररोज रात्री ७ ते १० यावेळेत श्रीमद् भागवत कथा सुरू आहे. दिवसेंदिवस कथा श्रावणाकरिता भाविकांची प्रचंड मोठी गर्दी होत आहे. मंगळवारी महाराजांनी आपल्या शब्दसुमनांनी विदुर आणि मैत्रेय ऋषी यांच्यातील संवाद, कर्दम ऋषी आणि देवाहुती यांचे वर्णन, शिव आणि दक्ष राजाची कथा भाविकांसमोर मांडली. भागवत कथेतील प्रसंग ऐकताना भाविक मंत्रमुग्ध होऊन गेले.
विदुर आणि मैत्रेय ऋषी यांचा संवाद सांगताना रामगिरी महाराज म्हणाले, विदुराने मैत्रेयांना सृष्टी का निर्माण झाली ? भगवंत वेगवेगळ्या रूपात अवतार का घेतो ? असे प्रश्न केले. त्यावर मैत्रेय ऋषी प्रबोधन करतांना म्हणतात, भक्त जेव्हा संकटात सापडतो तेव्हा भगवंत प्रगट होतात. धर्म रक्षणासाठी अवतार घेतात. वेगवेगळ्या कारणांसाठी भगवंताने वेगवेगळ्या युगात अवतार घेतले. आत्म्याचा अभेद्य बुद्धीशी संयोग होतो तेव्हा जन्म देव जन्म घेतात. आत्म्याचा जेव्हा भेद बुद्धीशी संयोग होतो तेव्हा राक्षस जन्माला येतात. वेगवेगळ्या युगात राक्षसांना मारण्यासाठी भगवंताने अवतार घेतले. सनतकुमारांच्या शापामुळे राक्षस जन्माला आले. परंतु भगवंत राक्षसांचाही उद्धार करतात. भगवंताने जीवाच्या ४ खाणी निर्माण केल्या. विविधतेने नटलेल्या या विश्वात भगवंत व्यापून भरलेला आहे अशा प्रकारे सृष्टी निर्माण झाल्याचे सांगत शास्त्राने दिलेल्या मर्यादा प्रत्येक स्त्री – पुरुषाने पाळाव्यात असे रामगिरी महाराज म्हणाले.
कर्दम ऋषींना पत्नी देवाहुतीपासून नऊ कन्या व एक पुत्र झाला. या नऊ कन्या म्हणजे नववीध भक्ती आणि एक पुत्र कपिल मुनी म्हणजे ज्ञान जन्माला आले. त्यानंतर कदमऋषी तपस्या करण्यासाठी वनात निघून गेले. भगवतप्राप्ती झाली तरी साधना सोडू नये हे यातून दिसते. माता देवाहुतीने पुत्र कपिल मुनीला गुरु मानले. इंद्रिय विषयाच्या लालसेने आकर्षित होतात, यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता ? बंधन कोणत्या प्रकारचे असतात ? या देवाहुतीच्या प्रश्नावर कपिल मुनी म्हणतात, अहिंसा – सत्य – अपरिग्रह – ब्रह्मचर्य – तप – शौच – स्वाध्याय – मौन या तत्त्वांना जीवनात अनुसरावे. जर मनाला स्थिर केलं नाही तर अनेक जन्म घेत भटकत राहावे लागते असे रामगिरी महाराजांनी सांगितले.
शिव आणि दक्ष राजाची कथा सांगताना रामगिरी महाराज म्हणाले, दक्ष राजाच्या १६ कन्यांपैकी सती हिच्याशी भगवान शिव विवाहबद्ध झाले. अहंकारी माणसाचा सन्मान झाला नाहीतर तो अपमान मानतो. भगवान शिव सभागृहामध्ये असताना प्रजापती आल्यावर ते उभे राहिले नाही म्हणून दक्षाला राग आला. अपमान वाटला. दक्षाने शिवाचा अपमान करण्यासाठी यज्ञ केला. त्यात भगवान शिव यांना आमंत्रित केले नाही. परंतु निमंत्रण नसतानाही सती त्या यज्ञकार्यासाठी जाते. तिथे सतीचा अपमान केला जातो. दक्ष राजाकडून भगवान शिव संदर्भात अपमानजनक वक्तव्य केले जाते. यावर सती क्रोधाग्नी भडकवून स्वतःला अग्नीमध्ये समर्पित करते. सती भस्म होते. ही गोष्ट भगवान शिव यांना कळल्यावर ते क्रोधित होतात. आपल्या जटा आपटतात. त्यातून विरभद्र निर्माण होतात. वीरभद्राला दक्षाच्या यज्ञाचा ध्वंस करण्याची आज्ञा शिव करतात. वीरभद्र यज्ञ नष्ट करतो व दक्षाला मारून टाकतो. हा अद्भुत प्रसंग अत्यंत सुंद रित्या महाराजांनी श्रोत्यांसमोर उभा केला.



