श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- यकृताचे आरोग्य टिकवण्यासाठी आयुर्वेदीय जीवन शैली महत्त्वाची आहे. ज्यांच्या तपासणी अहवालात दोष सापडला त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना व सर्व सामान्य आरोग्य प्रेमींना पुढील काही दिवसात यकृत कार्य , विकार , उपचार यावर आधुनिक तसेच आयुर्वेदिक तज्ज्ञांमार्फत मोफत मार्गदर्शन उपलब्ध केले जाईल असे उत्तर महाराष्ट्र शिव आरोग्य सेना अध्यक्ष डॉ महेश क्षीरसागर यांनी सांगितले.
शिव आरोग्य सेना व त्रिमूर्ती आयुर्वेदच्या माध्यमातून झायडस हेल्थ केअर सहकार्याने त्रिमूर्ती आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र श्रीरामपुर येथे मोफत यकृत फायब्रो स्कॅन तपासणी शिबिर संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन डॉ. सतिष भट्टड , डॉ.महेश क्षीरसागर ,डॉ सौ.मंजिरी क्षीरसागर ह्यांनी केले ह्या वेळी डॉ.अमित मकवाना, डॉ.महेंद्र बोर्डे , डॉ.आनंद सोनवणे , डॉ.विराज कदम , ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मीकांत कुलकर्णी , प्रकाश धनवटे , श्रीराम माळवे , अनंत कुलकर्णी, प्रवीण फरगडे, बाळासाहेब गायकवाड , किशोर फाजगे उपस्थित होते.
यावेळी डॉ महेश क्षीरसागर म्हणाले, साधारण पणे मध्यम वयाच्या 38% लोकांमध्ये फॅटी लिव्हर अर्थात यकृतात अनावश्यक चरबी साठण्याची शक्यता असते. लवकर लक्षात न येणाऱ्या परंतु भविष्यात गंभीर आजार निर्माण करणाऱ्या ह्या आजाराची योग्य वेळेत तपासणी व निदान झाल्यास भविष्यातील धोका टाळता येतो.
यावेळी क्षीरसागर म्हणाले, वजन जास्त असणे , मधुमेह , उच्च रक्तदाब , रक्तातील कोलेस्टेरॉल जास्त असणे , तणाव , शारीरिक कष्ट व व्यायाम अत्यल्प असणारी तसेच जंक फूड चे प्रमाण जास्त असणारी जीवन शैली, असणाऱ्या व्यक्तीमध्ये यकृतातील चरबीचे प्रमाण वाढू शकते . यकृत कार्यात फायब्रोसिस झाल्याने ही अडथळा येतो. अल्कोहोल मुळे यकृताचे कार्य बिघडते मात्र मद्य न घेताही अशा प्रकारचे यकृत विकार होण्याचे प्रमाण सध्या खूप वाढले आहे . ह्यावरील तपासण्या महागड्या असल्याने ग्रामीण अथवा निम शहरी भागातील सर्व सामान्य व्यक्तिंना त्याचा लाभ होऊ शकत नाही यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
धन्वंतरी पूजन , स्तवनाने शिबिराची सुरुवात करण्यात आली.शिबिरात अत्याधुनिक परीक्षण यंत्राचा वापर करून तपासणी मध्ये यकृत मधील फायब्रोसिस तसेच चरबीचे प्रमाण शास्त्रीय दृष्ट्या ठरविण्यात आले व आलेला तपासणी अहवाल रुग्णांना सोपवण्यात आला.
शिबिरास शिवसेना शिर्डी लोकसभा माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे , शहर प्रमुख सचिन बडदे , तालुका प्रमुख राधाकिसन बोरकर ,लखन भगत , यासीन सय्यद , विविध पदाधिकारी , शिवसैनिक , महाविकास आघाडीचे विविध स्थानिक पदाधिकारी , युवा नेते सिध्दार्थ मुरकुटे ,माजी नगरसेविका मंजुश्री मुरकुटे , व्यापारी , उद्योजक , सामाजिक कार्यकर्ते , ज्येष्ठ नागरिक ह्यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या व तपासणी ही करून घेतली. साधारण ५८ जिज्ञासू व्यक्तींची तपासणी केली . ह्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
हजारो रुपये लागणाऱ्या ह्या तपासण्या मोफत करण्यात आल्याने उपस्थित रुग्णांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी मार्गदर्शन करताना आजच्या शिबिरात समाजासाठी धावपळ करणाऱ्या आणि कुटुंबात कर्ता असणाऱ्या व्यक्तींचा जास्त समावेश व्हावा असा प्रयत्न केला गेला.”असे उत्तर महाराष्ट्र शिव आरोग्य सेना अध्यक्ष डॉ महेश ह्यांनी सांगितले.
शिव आरोग्य सेना व त्रिमूर्ती आयुर्वेद च्या वतीने झायडस हेल्थ केअर प्रतिनिधी व शिबिरासाठी योगदान देणारे अमोल चाळगे, वैभव काकडे , प्रद्युम्न गुप्ता ह्यांचा सत्कार करण्यात आला तसेच मार्गदर्शना बद्दल डॉ अमोल कासार ह्यांचे ही आभार मानण्यात आले शिबिर यशस्वी करण्यासाठी मिलिंद वाळूंजकर, संदीप त्र्यंबके , रामनाथ गावडे , मंजुषा कुलकर्णी , पल्लवी शहापूरकर , ह्यांनी विशेष परिश्रम घेतले.




