लोणी दि.२६( जनता आवाज वृत्तसेवा ):- शेतक-यांना शेतीशी संबधित सर्व निविष्ठा आणि सेवा एकत्रिपणे मिळाव्यात पारंपारीक खतांबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करावे सेंद्रीय शेतीकडे शेतकऱ्यांची वाटचाल होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्र सुरु करण्यात आले असून, नगर जिल्ह्यात १८५० केंद्र सुरु होणार असल्याची माहिती महसूल, तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात १८५० प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्रे होणार;महसूलमंत्री विखे पाटील
या संदर्भात बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान किसान किसान समृध्दी केंद्र हे शेतक-यांसाठी एक स्टॉकशॉप म्हणून काम करीत आहेत. एकाच छताखाली वाजवी किमतीत खते, बियाणे, किटकनाशके आणि दर्जेदार कृषि निविष्ठा उपलब्ध करुन देण्याबरोबरच माती परिक्षण, बियाणे आणि खतं चाचणीची सुविधा या केंद्राशी जोडल्या गेलेल्या आहेत.या केंद्राच्या माध्यमातून खतांच्या वापरास प्रोत्साहन,संतुलित खतांच्या वापराबाबत मार्गदर्शन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरू केलेल्या सेंद्रीय शेतीच्या संकल्पनेकडे शेतकऱ्यांना वळविणे हे मोठे काम होणार आहे.
शासकीय कृषी योजनांची माहिती देण्याचे काम केंद्रातून यशस्वीपणे सुरु होईल,शेतकर्यांना उत्पादनापासून ते वितरण व्यवस्थेपर्यत प्रशिक्षित करणे आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यास या केंद्राची मोठी मदत होईल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.देशातील या केंद्रांची संख्या आता वाढविण्यात आली असून, गुरुवार दिनांक २७ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दूरदृष्य प्रणालीतून देशातील १ लाख २५ हजार केंद्राचे लोकार्पण करणार आहेत.राज्यात १४ हजार केंद्र सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले.
नगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये १ हजार ८५० केंद्र कार्यान्वित होत असून, यापैकी ५१० केंद्राचे उद्घाटन स्थानिक पातळीवर मान्यवरांच्या आणि शेतक-यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून शेतक-यांना कृषि योजनांशी जोडून घेणे, योजनांचा लाभ मिळवून देणे याबरोबरीने कृषि क्षेत्रातील बदलांबाबत योग्यतो संवाद कृषीतज्ञांच्या माध्यातून या केंद्रातून व्हावा हा प्रयत्न आहे.
कृषि क्षेत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमुलाग्र बदल करतानाच शेतक-यांच्या उत्पादीत मालासाठी हमीभाव देण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेतले. खतांच्या किमती नियंत्रीत राहण्यासाठी अनुदानाची उपलब्धता करुन दिली. याबरोबरीनेच किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतक-यांना आर्थिक सहाय्य ठरेल असे धोरण घेवून ही योजना यशस्वी करुन दाखविली. या योजनेचा १४ वा हप्ता देखील पंतप्रधान गुरुवारी शेतक-यांच्या खात्यात वर्ग करणार असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.
राज्य सरकारनेही एक रुपयात पीक विमा योजनेसारखी महत्वकांक्षी योजना सुरू केली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राहाता तालुक्यात १३७ केंद्राची सुरुवात होत असून, ३३ ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.केंद्राचे औपचारीक उद्घाटन बाभळेश्वर येथील कृषि विज्ञान केंद्रात सकाळी ११वाजता.आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतक-यांशी साधणारा संवाद दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून शेतक-यांना ऐकता येईल अशी व्यवस्था करण्यात आली असून, या कार्यक्रमास शेतकरी, फार्मस प्रोड्यूसर कंपन्या आणि शेतकरी गटाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर यांनी केले आहे.



