अशोकनगर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळे ग्रामीण भागात शैक्षणिक परिवर्तन घडले. त्यांना स्व.भास्करराव गलांडे पाटील यांनी मोलाची साथ दिली. त्यामुळेच शेतकरी कुटुंबातील व गोरगरिबांची मुले शिक्षण घेवून स्वावलंबी बनली, असे प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
अशोकनगर येथील भास्करराव गलांडे पाटील विद्यालयामध्ये पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे तर प्रमुख अतिथी म्हणून त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष साहेबराव घाडगे होते.
प्रमुख अतिथी साहेबराव घाडगे आपल्या भाषणात कर्मवीर भाऊराव पाटलांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर उलगडत नेला. ते म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेमुळे माझे जीवन बदलले. रयत शिक्षण संस्थेच्या ‘कमवा आणि शिका’ मधून शिक्षण घेऊन उच्चपदस्थ अधिकारी होण्याचा बहुमान मला मिळाला. रयत शिक्षण संस्थेमुळेच मी घडलो. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर, ‘प्रामाणिकपणे कष्ट करा’ हा सल्ला विद्यार्थ्यांना त्यांनी दिला. स्पर्धा परीक्षेला पर्याय नाही, असे ते म्हणाले.
याप्रसंगी भास्करराव गलांडे पाटील वकृत्व स्पर्धा पारितोषिकाचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. वकृत्व स्पर्धा चषक रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान विद्यालयास प्रदान करण्यात आला. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती निमित्त लक्षवेधी मिरवणूक, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, या सर्व स्पर्धेतील बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. डी. के. वडीतके यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.सूर्यकांत सराटे यांनी करुन दिला.
या कार्यक्रम प्रसंगी भास्करराव गलांडे पाटील यांच्या कन्या श्रीमती सुनीता गलांडे यांनी विद्यार्थ्यांना ट्रॉफी उपलब्ध करून दिल्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी अन्नदान डॉ.लोखंडे परिवार अशोकनगर यांनी केले.
याप्रसंगी अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सोपानराव राऊत, माजी संचालक काशिनाथ गोराणे, अशोक महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य सौ.सुनिताताई गायकवाड, अनिल गायके, डॉ.मंगेश उंडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे सेवक, ग्रामस्थ, विद्यालयाचे पर्यवेक्षक दिलीप बनकर यांचे सहकार्य लाभले. आभार प्रा.गावित यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रामदास गायकवाड, प्रा.श्रीमती शिंदे, प्रा.श्रीमती बनसोड यांनी केले.