नगर (जनता आवाज वृत्तसेवा):- ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत छत्रपतीच्या विद्यार्थ्यांनी केले मातीला नमन अन् वीरांना वंदन…वीर वीरांगणांच्या स्मरणार्थ ‘मेरी माटी, मेरा देश अभियान’ सर्व भारतभर राबविण्यात येत आहे. आपल्या अमर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ छत्रपती अभियांत्रिकी मध्ये सुद्धा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास विभागाअंतर्गत या अभियानाचे आयोजन केले गेले. सरकारने ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेने दिल्ली आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून ७ हजार ५०० गावांमध्ये देशी आणि स्थानिक वनस्पतींचे उद्यान उभारण्यासाठी ‘अमृत वाटिका’ योजना सुरू केली आहे. देशातील शहीद वीरांना सन्मानित करण्यासाठी सुरू केलेल्या या नवीन उपक्रमामध्ये सर्व ग्रामीण व शहरी भागांमधून तयार करण्यात आलेल्या अमृतवाटीका आणि वाटिकेची माती अमृत कलशातून राजधानी दिल्लीमध्ये पोहचवण्यात येणार आहे. ७५०० कलशांमध्ये आलेली माती आणि वनस्पती यांचे मिश्रण करून राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ ‘अमृत वाटिका’ बांधण्यात येणार आहे.
अभियानांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपापल्या परिसरातून आणलेली एक-एक मूठ माती अमृत कलशात एकत्र केली. तसेच सेल्फी साठी उत्सुक असलेल्या विद्यार्थी वर्गाने आणि शिक्षकांनी माती सोबत काढलेला सेल्फी शासनाच्या वेबसाईटवर अपलोड केले. ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’या अभियानाचं प्रतिक असलेली ही अमृत वाटिका म्हणजे एक अभूतपूर्व आणि महत्वाकांक्षी उपक्रम असून असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या आणि प्रत्येक नागरिकाच्या मनात देशकार्याची ज्योत पेटवतात, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे यांनी केले.
प्रा. गिरीश पाटील आणि प्रा. ए. के. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन मधील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत या अभियाना विषयीची माहिती पोहोचवली. ‘मातीला नमन अन् वीरांना वंदन’ या प्रेरणादायी वाक्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी प्रा. अक्षय देखणे, प्रा. मोहनेश मांढरे, प्रा. आर. ए. घाडगे, प्रा. टी. पी. धंगेकर या सर्वांनी विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच या कार्यक्रमासाठी प्रा. पी. जी. निकम, प्रा. एस. एम. वाळके, डॉ. एम. के. भोसले, प्रा. व्ही. व्ही. जगताप, प्रा. ए. बी. काळे हे सर्व विभागप्रमुखदेखील उपस्थित होते.