राहाता दि.२७ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-स्वत:च्या तालुक्यातील जनतेला पिण्याचे पाणी देवू शकत नाहीत त्यांनी इकडे येवून विकासाच्या गप्पा मारू नयेत. आम्हांला तुमच्या सल्ल्याची गरज नाही. आमच्या तालुक्यातील जनता विकासला साथ देणारी आहे. इथले प्रपंच उध्वस्त करण्याचे काम करू नका. पाहुणे म्हणून येता पाहुण्यासारखे राहा, भाडेकरी बनण्याचा प्रयत्न करू नका अशी खोचक टिका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
राहाता शहरात सुमारे १० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळा तसेच शहीद जवान अनिल निकाळे यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थीतीत करण्यात आला. मुस्लिम, ख्रिश्चन, गोसावी आणि लिंगायत समाजाकरीता दफनभूमीची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल विखे पाटील यांचा समाजातर्फे नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, मुकूंदराव सदाफळ, साहेबराव निधाने, मौलना रफीक, भाऊसाहेब जेजूरकर माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, अॅड रघूनाथ बोठे, प्रा.निकाळे, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसिलदार अमोल मोरे, बांधकाम विभागाचे श्रीनिवास वर्पे यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवडा सुरू आहे. यानिमीत्ताने मुस्लीम, ख्रिश्चन, गोसावी आणि लिंगायत समाजा करीता सेवाभावी काम करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. गेली अनेक वर्षे दफनभूमीची मागणी होती. राज्य सरकारने याबाबत मंत्रीमंडळात विना हरकत निर्णय केला याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचे आभार त्यांनी मानले.
शेती महामंडळाच्या जमीनीचा विनीयोग समाजहितासाठी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केल्यामुळेच साकुरीच्या पाणी पुरवठा योजनेला जागा उपलब्ध करून देता आली. आता या जागेवर भव्य असा औद्योगिक वसाहतीचा प्रकल्प उभा राहील. याची सर्व प्रक्रीया सुरू झाली आहे.
तालुक्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महींद्रा, टाटा आणि अन्य आयटी कंपन्या समवेत प्राथमिक बोलणे झाले असून, या कंपन्यांनी प्रकल्प उभारणीस सकारात्मकता दर्शवली असल्याचे ना.विखे पाटील यांनी सांगितले.
आज शिर्डी येथे कार्यान्वित झालेले अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय ही उत्तर नगर जिल्ह्याकरीता मोठी उपलब्धी आहे. या कार्यालयाच्या इमारतीसाठी १०० कोटी रूपयांचा निधी लवकरच मंजूर होईल. विकासाचे प्रकल्प काम करून उभे करावे लागतात केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाहीत. अनेकांना महसूल मंत्री पदाची संधी मिळाली पण जिल्ह्यासाठी काहीच करणे त्यांना सुचले नाही. जे स्वत:च्या तालुक्यातील जनतेला पिण्याचे पाणी देवू शकत नाहीत ते इकडे येवून सल्ले देतात, विकासाच्या गप्पा मारतात. पण आम्हाला तुमच्या सल्ल्याची गरज नाही. सामाजिक जबाबदारीतून इथे विकास साध्य होत आहे. या विकासाला गालबोट लावण्याचे काम सुरू झाले आहे. पण पाहुणे म्हणून या भाडेकरी बनू नका इथे जागा नाही. व्यक्तिद्वेश करून तालुक्यातील जनतेचे प्रपंच उध्वस्त करू नका, आमच्याकडे वाळू आणि क्रशरचे माफीयाराज नाही. महसूल विभागात काही कठोर निर्णय केले यामुळे अनेकांची चिडचिड वाढली असल्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे म्हणाले की, राहाता शहरात निधी उपलब्ध करून देत विकासाची प्रक्रीया पुढे नेणारे मंत्री विखे पाटील हे खरे विकास पुरुष आहेत. नेवासा तालुक्यात पाच वर्षात पाच कोटी मिळतात राहाता तालुक्यात एका वर्षांत दहा कोटीचा निधी मिळतो हे विखे यांच्या कार्यप्रणालीचे द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले.
राहाता शहरात शहीद जवान अनिल निकाळे यांच्या स्मारकासाठी अजून निधी उपलब्ध करून देणार असून शहीद जवानांची स्मारक ही स्फूत्तीस्थान असल्याचे त्यांनी सांगितले. या स्मारकाच्या भूमीपूजनाचे औचित्य साधून “मेरी माटी मेरा देश” उपक्रमाचा शुभारंभ विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.