राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा):-राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची गेल्या ८ दिवसा पासून बसेस बंद झाल्याच्या अनेक तक्रारी विद्यार्थ्यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांना समक्ष भेटून मांडल्याने त्याबाबत विचारणा करण्यासाठी आमदार तनपुरे यांनी बस स्थानकात येऊन श्रीरामपूर विभागाचे आगार प्रमुख व इतर अधिकाऱ्यांची भेट घेऊन सदर बसेस लवकरात लवकर सुरु करण्याच्या सूचना केल्या.
आमदार तनपुरे यांना मतदार संघात फिरताना तालुक्यातील उंबरे वांबोरी खडांबे चिंचाळे, आदि भागातील शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी समक्ष भेटून गेल्या ८ दिवसापासून आम्हाला शाळेत व महाविद्यालय येथे जाण्यासाठी बसेस येत नाही आल्या तर वेळेवर येत नसल्याने आमची मोठी गैरसोय होत आहे तसेच खडांबे परिसरातील विद्यार्थ्यांना बसेस न आल्यास पायी पायी चालत वांबोरी फाटा नगर मनमाड राज्य मार्गांवर जाऊन बसेस पकडाव्या लागतात असे सांगताना हा प्रकार आमदार तनपुरे यांनी समक्ष पाहिला असल्याने त्यांनी आज थेट बस स्थानकात येऊन विद्यार्थ्यांच्या समस्या श्रीरामपूरचे आगार प्रमुख श्रीमती कुटे राहुरीचे बस स्थानक प्रमुख अशोक पटारे यांना सांगितल्या. या बसेस बंद होण्याचे किंवा उशिरा का येतात याबाबत विचारणा केली असता एस टी च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की गणेशाउत्सवासाठी शासनाने अनेक बसेस कोकणातील नागरिकांच्या साठी पाठवल्या असून त्यामुळे काही बसेसच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील काही बसेस सुरु आहेत. कोविड पूर्वी ज्या ज्या मार्गावरून बसेस सुरु होत्या त्या पूर्ववत सुरु केल्या आहेत. त्यात काही बसेस इतर आगरातील असल्याने त्यांनी त्या बंद केल्या होत्या त्या सर्व बसेस दोन दिवसात पूर्ववत सुरु होतील असे सांगितले.
राहुरीच्या बस स्थानकाची जी दुरावस्था झाली आहे त्याची पहाणी करून किती बसेस येतात किती प्लॅटफॉर्म आहेत याची चौकशी करून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. बस स्थानकाच्या इमारतीसाठी व प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांसाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठका घेऊन बस स्थानकाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात आली . राहुरी बस स्थानकाचे कामाची निविदा निघणार असून त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी लवकरच प्राप्त होणार असल्याचे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. या निधीतुन काम सुरु होईल. बस स्थानक परिसरातील दुरावस्थाची पाहणी करून बस स्थानक आवारात रात्री पूर्ण अंधाराचे साम्राज्य असल्याच्या तक्रारी रिक्षा चालक व अनेक प्रवाशांनी मांडल्या असता आगार प्रमुख यांनी तातडीने वीज पुरवठा सुरळीत केला जाईल असे सांगितले.तसेच बस स्थानक आवारात अस्वच्छता पसरली असून त्याबाबत एसटीच्या अधिकारी यांनी सांगितले की बाहेरचे अनेक व्यापारी स्थानक परिसरात घाण केरकचरा आणून टाकत असल्याने प्रचंड दुर्गधी पसरली आहे त्याबाबत आमदार तनपूरे यांनी राहुरी नगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी यांना साफसफाईच्या सूचना केल्या.
यावेळी एसटीचे अधिकारी श्री कासार, श्रीरामपूरचे आगार स्थानक प्रमुख श्री.पठारे राहुरीचे स्थानक प्रमुख अशोक पटारे,संदिप सोनवणे, ज्ञानेश्वर जगधने विश्वास पवार भाऊसाहेब कोहकडे बाळासाहेब लटके अमोल हरीश्चंद्रे पत्रकार संजय कुलकर्णी आदि उपस्थित होते.