संगमनेर,( जनता आवाज वृत्तसेवा ):-गणेश कारखान्याची काय चौकशी करायची ती करा. मी तुमच्या धमक्यांना भित नाही. पण तुमच्यामागे काय लागणार आहे हेही लक्षात ठेवा. असे सूचक वक्तव्य करुन आमची संस्कृती दिवे लावण्याची आहे बंद करण्याची नाही असा टोला महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.
संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहात विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. थोरातांनी केलेल्या आरोपांना उत्तरं देण्याची गरज नाही. कारण या तालुक्यात फुकटचे श्रेय लाटण्याची पद्धत ही जुनीच आहे. पुणे-नाशिक महामार्गाचे काम हे केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने केंद्र सरकारच्या निधीतून झाले. सहाजिकच त्याचे उद्घाटन भाजपा कार्यकर्त्यांनी करणे काहीही गैर नाही. त्यांना आमचा हस्तक्षेप वाटत असेल, तर त्यांच्या आरोपांची दखल घेण्याची गरज नाही. कारण आमची संस्कृती दिवे लावण्याची आहे बंद करण्याची नाही. राज्यात आणि केंद्रात आमचे सरकार आहे. त्यांच्या निधीतील कामांचे उद्घाटन आम्ही करणार. कुणाला काय वाटते याची चिंता आम्हाला नाही.
बाळासाहेबांच्या आरोपांची फारशी दखल घ्यायची गरज नाही. पस्तीस वर्ष जे तालुक्याला पाणी देवू शकत नाही त्यांनी घडवायच्या आणि मोडायची भाषा करु नये. राहाता तालुका टँकरमुक्त आहे, या तालुक्यात मात्र 25-30 पेक्षा जास्त टँकर सुरु आहेत हा एवठा मोठा फरक जनतेच्या समोर आहे. त्यामुळे तालुक्याला पाणी देण्याची जबाबदारी आता आमच्या सरकारची आहे. जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना पूर्ण करुन तालुक्यातील जनतेला पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देणे हे आमची जबाबदारी पूर्ण करणार आहोत.
गणेश कारखान्या संदर्भात थोरातांनी केलेल्या आरोपांवर मंत्री विखे पाटील म्हणाले की, त्यांना काय चौकशी करायची त्यांनी ती करावी. त्यामुळे कोणतीही चौकशी करा, तुमच्या धमक्यांना आम्ही भित नाही. स्वता: काय करायचे ते करावे. बंद पडलेला कारखाना चालू केला. कामगारांचे पगार दिलेत. यापूर्वी कामगारांचे पगार बडवून अनेकजन पळून गेले. राज्यातील पहिला प्रयोग हा सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर घेण्याबाबतचा हा गणेशच्या निमित्ताने यशस्वी करुन दाखविला. त्यामुळे चौकशीच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही पण तुमच्या मागे काय लागणार आहे हेही त्यांनी लक्षात ठेवावे असे सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.