संगमनेर,( जनता आवाज वृत्तसेवा ):- भोजापूर लाभक्षेत्रातील पाण्याच्या प्रश्नाबाबत शेतकऱ्यांची मतं जाणून घेवून, तातडीने कामाच्या उपाययोजना कराव्यात, पाणी मिळण्यात अडचणी दूर करुन शेतकऱ्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करावे आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा सूचना महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
भोजापूर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी प्रश्नांमुळे गावोगावी आंदोलनं सुरु केली आहेत. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या असून, याची दखल पालकमंत्री विखे पाटीलयांनी घेतली. या पार्श्वभूमीवर संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत विखे पाटील यांनी बैठक घेवून अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या आंदोलनाची गांभिर्याने दखल घेण्याच्या सूचनाही दिल्या. याबैठकीला गोदावरी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे, उपकार्य.अभियंता सुभाष पगारे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सतिष कानवडे, अमोल खताळ, शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, शरद गोर्डे, जावेद जहागिरदार आदी याप्रसंगी उपस्थित होते.
प्रारंभी मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून भोजापूर चारीच्या प्रश्नाबाबत असलेल्या समस्या जाणून घेतल्या. प्रामुख्याने नगरजिल्ह्याच्या वाट्याचे पाणी मिळतच नसल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी चाऱ्या खोदण्याच्याही घटना घडल्याने लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळू शकलेले नाही. उर्वरीत गावातील चारीची कामं पूर्ण करण्याकरीता निधी खर्च होत नसल्याचे या बैठकीत प्रामुख्याने समोर आले. जलसंपदा विभागाबरोबरच जलसंधारण विभागाच्याही हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. यासर्व समस्या लक्षात घेवून अधिकाऱ्यांनी आजच लाभक्षेत्रातील गावांमध्ये जावून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करावी अशा सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या आहेत.
मंत्री विखे पाटील यांनी निळवंडे कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाणीप्रश्नासंदर्भातही अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. अकोले तालुक्यातील काही गावांमध्ये कालव्यातून होत असलेल्या गळतीबाबत सुरु असलेल्या पाच पैकी तीन ठिकाणांवरील कामे पूर्णत्वास गेली असून, अन्य दोन ठिकाणची कामे पूर्ण करण्याचे काम वेगाने सुरु आहेत. पावसाने उघडीप दिल्यास ही कामेसूद्धा येत्या काही दिवसात पूर्ण होतील अशी ग्वाही जिल्ह्याचे अधिक्षक अभियंता बाळासाहेब शेटे यांनी बैठकीत सांगितले. मात्र जलसंपदा विभागाच्या वेळकाढू धोरणावर मंत्री विखे पाटील यांनी तिव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. कालव्यातून पाणी सोडण्याबाबत शेतकऱ्यांना आश्वासीत केले आहे. त्यामुळे आता कोणतीही कारणं न सांगता पाणी सोडण्याचेच नियोजन करा. पावसाअभावी कामे होणार नसतील तर प्लास्टिक कागदचा वापर करुन पाणी सोडण्याबाबत गांभिर्याने कार्यवाही करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.




