लोणी दि. ३० ( जनता आवाज वृत्तसेवा ):- केंद्र सरकारच्या सहकार धोरणामुळे सहकारी बॅकींग क्षेत्राची विश्वासार्हता अधिक बळकट होत आहे. डिजीटल क्रांतीच्या माध्यमातून व्यवसायात आलेली गती पाहाता सामान्य माणूस आता बॅकींग क्षेत्राशी सहजपणे जोडला जात आहे. भविष्यात सहकारी बॅकांनी ऑनलाईन आणि मोबाईल बॅक सुविधेचा अंतर्भाव आपल्या सेवेत करावा अशी अपेक्षा महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
प्रवरा सहकारी बॅकेची ४९ वी. वार्षिक सर्वसाधारण सभा बॅकेचे चेअरमन डॉ.भास्करराव खर्डे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. खासदार डॉ.सुजय विखे पाटील, माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, डॉ.विखे पाटील कारखान्याचे चेरअमन कैलास तांबे, ट्रक्स वाहतूक सोसायटीचे चेअरमन नंदू राठी, व्हा.चेअरमन मच्छिंद्र थेटे, आण्णासाहेब भोसले, तुकाराम बेंद्रे, बॅकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ.सौरभ बालोटे यांच्यासह सर्व संचालक आणि सभासद या सभेस उपस्थित होते. विषय पत्रिकेवर असलेल्या सर्व विषयांना सभासदांनी हात उंचावत एकमताने मंजुरी दिली.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सभेस मार्गदर्शन करताना म्हणाले की, प्रवरा सहकारी बॅकेने अनेक चढउतार पाहून ५० वर्षांची वाटचाल यशस्वीपणे पुर्ण करीत आहे. खासदार साहेबांची दूरदृष्टी आणि स्व.कॅप्टन विजयराव गुणे यांची शिस्त यामुळेच प्रवरा सहकारी बॅकेची ही वाटचाल यशस्वी ठरली. अनेक सहकारी व नागरी बॅकांची पडझड झाली परंतू आपल्या बॅकेने आर्थिक शिस्त कायम ठेवल्यामुळेच सहकारी बॅकींग क्षेत्रात मिळविलेला नावलौकीक खुप मोठा असल्याचे ते म्हणाले.
देशाच्या पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्रायल सुरु झाले. या मंत्रालयाची धुरा अमित शाह सांभाळत असल्यामुळेच नव्या सहकार धोरणाचा लाभ हा सोसायटी पासून ते शिखर बॅकेंपर्यंत सर्वांनाच होत आहे. बॅकींग क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात सामान्य माणूस आता जोडला जात असल्यामुळे मोठे आर्थिक स्थैर्य मिळत आहे. त्यामुळेच वाढत्या स्पर्धेत आता सहकारी बॅकांनी टिकण्याची तयारी ठेवली पाहीजे.
जनधन योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांनी आता डिजीटल क्रांती स्विकारली आहे, बॅकींग व्यवसायालाही गती आली. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आलेली आर्थिक साक्षरता आता वेळ आणि खर्च वाचविण्यास सहकार्य करीत आहे. केंद्र सरकारच्या ५२ योजनांचा लाभ लाभार्थ्यांना थेट बॅकेंच्या माध्यमातून मिळत असल्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी झाला ही विश्वासार्हताच बॅकींग व्यवस्थेला बळकटी देत असल्याचे स्पष्ट करुन, मंत्री विखे पाटील म्हणाले की, प्रवरा सहकारी बॅकेनेही १२०० कोटी रुपयांच्या व्यवसायाचा पहिला टप्पा पुर्ण करुन, आर्थिक सक्षमता सिध्द करुन दाखविल्याबद्दल त्यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
जिल्ह्यात आज दुस-या क्रमांकावर आपली बॅक असून, येणा-या काळात पाच शाखा सुरु करण्याचे उदिष्ठ ठेवण्यात आले आहे. आरबीआयचे सर्व निकष पुर्ण करुन, प्रवरा बॅक आता आर्थिक दृष्ट्या सक्षम झाली आहे. व्यवहारातील गती अधिक वाढावी म्हणून बॅकेचे कामकाज दोन सत्रांमध्ये चालविण्याबाबतही संचालक मंडळाने विचार करावा अशा सुचना त्यांनी केल्या.
माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी आपल्या भाषणात प्रवरा सहकारी बॅकेने आता एटीएमची आणि बॅकींगची सुविधा अधिक क्षमतेने वाढवावी, सभासदाला सहज कर्ज मिळेल अशी सेवा बॅकेने द्यावी. आज इतर खासगी बॅका घर बांधण्यासाठी कर्ज देत आहेत. परंतू त्या आपल्या बॅका नाहीत. प्रवरा सहकारी बॅकेने हौसिंग लोन सुरु करुन, सामान्य माणसाला दिलासा द्यावा, जेणेकरुन ही बॅक आपली वाटले असा संदेश मिळेल. ठेवी वाढल्या असल्या तरी, कर्ज देण्याची प्रक्रीया सुध्दा वाढली पाहीजे असे मत त्यांनी व्यक्त केले. बॅकेचे चेअरमन डॉ.भास्करराव खर्डे पाटील यांनी अहवाल वाचन करुन, अहवाल सालातील प्रगतीचा मागोवा घेतला.