नगर (जनता आवाज वृत्तसेवा ):- ‘स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु, आरोग्य आपले निरोगी बनवू’ हे घोषवाक्य म्हणत नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतलेल्या’स्वच्छता हीच सेवा ‘ या अभियानामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकही सामील झाले. स्वच्छतेची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रामध्ये निरोगी आणि शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी सर्वांनी स्वच्छतेचे महत्त्व समजून घेणे आणि ते कायम राखणे आवश्यक असून ”स्वच्छता” माणसाचे आत्मदर्शन घडविते, असे प्रोत्साहनपर वक्तव्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वाय. आर. खर्डे यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना केले. स्वच्छता अभियानाला सुरुवात स्वतः प्राचार्यांनी महाविद्यालयाच्या आवारातील कचरा उचलून केली. प्राचार्यांचे व शिक्षकांचे अनुकरण करत विद्यार्थ्यांनी अजून जोमाने स्वच्छता मोहीम पुढे सरकवली.
भारत कचरामुक्त आणि स्वच्छ असावा असे उद्दिष्ट असणाऱ्या या अभियानामध्ये सिव्हील विभागाचे प्रमुख प्रा. पी. जी. निकम, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख प्रा. एस. एम. वाळके, प्रथम वर्ष समन्वयक डॉ. एम. के. भोसले, कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विभाग प्रमुख प्रा. व्ही. व्ही. जगताप, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. ए. बी. काळे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. जी. एस. पाटील, प्रा. अक्षय देखणे, प्रा. अमेय कुलकर्णी यांच्याबरोबरच सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे सहभागी झाले होते. महाविद्यालयामध्ये असणाऱ्या विविध विभागाच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळा परिसर साफ-सफाई साठी नेमून दिल्याने महव्यालयातील तसेच आजूबाजूचा सर्व परिसर स्वच्छ करण्यासाठी हातभार लागला. विद्यार्थ्यांनी केलेल्या या स्वच्छता श्रमदानाबद्दल प्राचार्यांनी सर्वांचे कौतुक केले.