राहाता दि. १( जनता आवाज वृत्तसेवा ):-स्वच्छ आणि सुंदर गाव अशी ओळख निर्माण होण्यासाठी स्वच्छता ही सेवा हे अभियान महत्वपूर्ण ठरणार आहे. केवळ एक दिवसा करीता नाही तर, पुढचे अनेक दिवस स्वच्छता अभियान राबविण्यासाठी प्रत्येक नागरीकाने स्वच्छता दूत म्हणून पुढे येण्याचे आवाहन महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतींचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोंबर पासून ‘स्वच्छता पंधरवाडा – स्वच्छता ही सेवा’ हे अभियान राबविण्याचे आवाहन केले आहे. यासाठी १ ऑक्टोंबर २०२३ रोजी स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास हे अभियान सर्वत्र आयोजित करण्यात आले होते. महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंचायत समितीच्या प्रांगणात या अभियानात सहभाग नोंदविला. याप्रसंगी प्रांताधिकारी माणीकराव आहेर, तहसलिदार अमोल मोरे, गटविकास आधिकारी जालिंदर पठारे, गटशिक्षण आधिकारी पावसे तसेच साईयोग फौंडेशनचे कार्यकर्ते आणि नागरीक या अभियानात सहभागी झाले होते.
स्वच्छतेच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच देशवासियांना आवाहन करुन, हा उपक्रम प्रत्येकाच्या जीवनाचा भाग बनावा असा संदेश दिला आहे. व्यक्तिगत आणि सामुहीक जीवनाच्या दृष्टीने स्वच्छतेचे असलेले महत्व लोकसहभागामुळे अधिक आधोरेखित होत चालले आहे. परंतू अभियान हे एक दिवसापुरते मर्यादीत न ठेवता पुढील अनेक दिवस स्वच्छतेचे अभियान कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात आणि शहरात राबवावे असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.
शिर्डी मतदार संघात प्रत्येक गावामध्ये आज हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गावातील संस्थाचे पदाधिकारी, नागरीक, युवक, महिला या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शिर्डी येथील अभियानात बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, माजी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, कैलास कोते, नगराध्यक्ष सचिन शिंदे, माजी नगरसेवक गजानन शेवरेकर, जगन्नाथ गोंदकर, मंगेश त्रिभूवन, सचिन तांबे, सुधीर शिंदे, राम आहेर, शब्बीर सय्यद, बाळासाहेब लुटे, दादा काळे, संजय सावंत यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.