श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेते व तत्वज्ञ होते.ब्रिटीश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या यशस्वी मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी महात्मा गांधीजींनी अहिंसक आंदोलनाचा वापर केला. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी म. गांधी यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले, लालबहादूर शास्त्री यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात गांधीजींना मोलाची साथ दिली, असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.
आ. कानडे यांच्या यशोधन कार्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आझाद मैदान येथे म. गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस तसेच मेन रोडवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास आ. कानडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार तसेच हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यावेळी आ. कानडे बोलत होते.
यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, सचिन जगताप, शहराध्यक्ष प्रविण काळे, अशोक भोसले, सुरेश पवार, कार्लस साठे, राजेंद्र औताडे, आशिष शिंदे, भैय्या शहा, रज्जाक पठाण, असलम सय्यद, फयाज बागवान, महेबूब शाह, सरवरआली सय्यद, मोसिन कुरेशी, इम्रान शेख, संतोष निकम आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. कानडे म्हणाले, म. गांधी यांनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्वांचा पुरस्कार केला. स्वतः या तत्वानुसार जगले आणि इतरांनाही तसे करावे असे सुचविले. त्यांनी खेड्यांना खर्या भारताचे मुळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. गांधीजींच्या भाषणाने प्रेरीत झालेल्या लालबहादूर शास्त्री यांनी अखेरपर्यंत गांधीजींची साथ सोडली नाही. शैक्षणिक व सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय्य होते. या दोन्ही महापुरुषांच्या विचारांची आज खरी गरज आहे, असे आ. कानडे यावेळी म्हणाले.



