श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव गणामध्ये काल दि. २ रोजी झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशा सूचना आमदार लहू कानडे यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या आहेत.
मागील वर्षीच्या सततच्या व अतिवृष्टीच्या पावसाने शेतकरी वर्ग पुरता कोलमडला आहे. त्या नुकसानीचे पैसे अद्याप शेतकर्यांच्या पदरात पडलेले नाहीत. त्यातच गेली तीन चार महिने पाऊस नसल्याने खरीपाची पिके जळून गेली. उपलब्ध पाण्यावर शेतकर्यांनी काही प्रमाणात पीके जगविली. ही पिके कशीबशी आली असताना काल या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.
उंदिरगाव तसेच मुठेवाडगाव व आजूबाजूच्या शिवारामध्ये काल मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्यामुळे सोयाबीन, मका, कपाशी यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच शेतकरी मेटाकुटीला आला असताना या पावसामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला असल्याचे आ. कानडे यांनी म्हटले आहे.
याबाबत महसूल विभागाचे मंडल अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत तसेच नुकसानीची माहिती वरिष्ठाना कळवावी, आपण स्वतः या भागाचा दौरा करणार असून आपणही प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना आ. कानडे यांनी तहसीलदार व कृषी आधिकार्यांना दिल्या आहेत.



