नेवासा फाटा:( जनता आवाज वृत्तसेवा):- मराठा सेवा संघ संचलित अहमदनगर जिल्हा मराठा नागरी पतसंस्थेच्या नेवासा शाखेच्या १९ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित स्नेह मेळाव्याला व गुणगौरव सोहळयाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात नेवासा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.मराठा नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून पत नसणाऱ्यांना पत निर्माण करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री विजयकुमार ठुबे यांनी यावेळी बोलताना दिली.
नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या गुरुवर्य बन्सी महाराज तांबे सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्याच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार ठुबे हे होते तर मुळा कारखान्याचे संचालक अनिलराव मते पाटील, पतसंस्थेचे उपाध्यक्ष पत्रकार किशोर मरकड,डॉ.मुरलीधर कराळे,संचालक ज्ञानेश्वर अनुभुले,संस्थेचे जेष्ठ सभासद पी.आर.जाधव,संचालक द्वारकाधीश राजेभोसले,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रावसाहेब घुमरे,पतसंस्थेचे नेवासा शाखा अध्यक्ष संभाजीराव मते पाटील,तज्ञ संचालक राजेंद्र धोणे, अच्चूतराव गाडे, रविंद्र शितोळे,संचालिका डॉ. सौ.कल्पना ठुबे,राजश्री शितोळे,मुख्य प्रवर्तक लक्ष्मण सोनाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकड,अशोक साळुंके, किशोर भणगे,राजेश जगताप,उपमुख्य कार्यकारी अधिकारी बबन कुपेकर,मराठा सुकाणू समितीचे प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे,प्रभारी शाखाधिकारी संतोष पारखे,लिपिक सूरज कडू,निलेश जाधव यांच्यासह नेवासा शाखा स्थानिक सल्लागार मंडळाचे पदाधिकारी यावेळी विचारमंचावर उपस्थित होते.
यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज,राजमाता जिजाऊ माँ साहेब,छत्रपती शिवाजी महाराज,राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन जिजाऊ वंदना गाण्यात आली.मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रावसाहेब घुमरे यांनी आलेल्या मान्यवरांचे व सभासदांचे स्वागत केले. बाळासाहेब देवखिळे यांनी प्रास्ताविक केले.नेवासा शाखा अध्यक्ष संभाजीराव मते यांनी पतसंस्थेच्या उत्कर्षासाठी सभासदांनी दिलेल्या पाठबळामुळे संस्थेच्या कोटीच्यावर ठेवी झाल्या असल्याचे सांगून पतसंस्थेला उत्कर्षाकडे नेण्यासाठी अधिकाधिक ठेवी ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी अध्यक्षीय मनोगतात बोलताना शिवश्री विजयकुमार ठुबे म्हणाले की पतसंस्थेच्या नेवासा शाखेचे कार्य कौतुकास्पद असे आहे, पत नसणाऱ्यांना पत निर्माण करण्याचे काम पतसंस्था करेल,पतसंस्थेचा आलेख उंचावर नेण्यासाठी सभासदांचे पाठबळ गरजेचे आहे,येथील नूतन इमारतीच्या कामासाठी गती देऊ,वैभवात भर पडेल अशी इमारत लवकरच उभी होईल असे सांगून त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना जीवनात उंच भरारी घ्या,आरक्षणाच्या भरवशावर न रहाता आपल्या गुणवत्तेच्या माध्यमातून कार्य कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी पुढे या असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा विचारवंतांची पुस्तके व गुलाबपुष्प भेट देऊन सन्मान करण्यात आला.तर विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले तर किशोर भणगे यांनी उपस्थितांचे आभार मानले तर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी पतसंस्थेचे हितचिंतक, सभासद, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



