लोणी दि.४( जनता आवाज वृत्तसेवा ):- प्रवरा शिक्षक तांत्रिक व अतांत्रिक सहकारी पतपसंस्थेचा कारभार पारदर्शी असून संचालक मंडळाने काटकसरीने कारभार करून संस्थेला नफा मिळवून दिला आहे. संस्थेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी संस्थेने आणखी पर्याय निवडण्याची गरज असल्याचे प्रतिपादन रणरागीणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनी केले.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या तांत्रिक व अतांत्रिक सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ. धनश्रीताई विखे पाटील बोलत होत्या. यावेळी संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदिप दिघे, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाणे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. विजयकुमार राठी, अध्यक्ष प्रा.राजेंद्र निंबाळकर, उपाध्यक्ष हौशिराम त्रिभान, डॉ. सतिश तुरकणे, प्राचार्य अर्जुन आहेर, प्राचार्य रवींद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
सौ. धनश्रीताई विखे पाटील म्हणाल्या की, सभासदांच्या हिताबरोबरचं सामाजिक बांधीलकी जपण्याचे काम प्रवरेच्या सर्व संस्थानी केले आहे. मयत सभासद कर्जमाफी, अपघात विमा योजना, कुंटुंब कल्याण निधी, सभासदांच्या मुलींसाठी कन्यादान योजना यातून सभासदांचा विकास होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रारंभी अध्यक्ष प्रा. राजेंद्र निंबाळकर यांनी अहवाल वाचन केले तर सचिव रोहीत म्हस्के यांनी विषय वाचन केले. यावेळी सभासदांच्या पाल्यांचा शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी केल्याबद्दल तसेच निवृत्त सभासदांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. रविंद्र काकडे यांनी केले. आभार साहेबराव आहेर यांनी व्यक्त केले. यावेळी संचालक मंदाकिनी ढवळे, सुर्यभान जाधव, किशोर गुळवे, अमोल गाढवे, संदिप घोलप, जयश्री थोरात, नितीन साबळे, संदिप बुधे, दत्तात्रय सांबारे, सुनिल अनाप, सुमित आहेर यांच्यासह सभासद उपस्थित होते.



