शेवगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- विद्युत तारा एकमेकांना घासून ठिणग्या खाली पडल्याने लागलेल्या आगीत दहिगाव-ने (ता. शेवगाव) येथील शेतकऱ्याचा ७ एकर ऊस जळून खाक झाला. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून जेसीबीने चर खोदल्याने शेजारचा ८ एकर ऊस वाचला.
दहिगाव-ने येथे विनय नाथ पाउलबुधे व गीताताई नाथ पाउलबुधे यांचा १५ एकर आडसाली ऊसाचे क्षेत्र असून, त्यावरून वीजवाहक तारा गेल्या आहेत. मंगळवारी सकाळी विद्युत तारा एकमेकांना चिटकल्याने आगीच्या ठिणग्या खाली उसाच्या पिकात पडल्या. त्यामुळे वाळलेल्या उसाच्या पानांनी लगेच पेट घेतल्या. ऐन उन्हाच्या तडाख्यात एकदम आगडोंब उसळला. ही बाब लक्षात येताच, ग्रामस्थांनी जेसीबीने चर खोदून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत १५ पैकी ७ एकर ऊसाचा कोळसा झाला होता. उर्वरित ८ एकर ऊस वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले.
दरम्यान, पाऊलबुधे यांनी महावितरणबाबत संताप व्यक्त केला. महावितरणला वीजवाहक तारा ओढण्यासाठी वेळोवेळी अर्ज दिले. वस्तूस्थिती दाखविली, पण तरीही त्यांनी दुर्लक्ष केले, देखभाल दुरुस्तीचे काम वेळेवर झाले असते, तर ही दुर्घटना टळली असती. महावितरणच्या दुर्लक्षामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. तब्बल ४०० टन उसाचे नुकसान झाले असून, वीज कंपनीने ही भरपाई देण्याची मागणी पाउलबुधे यांनी केली आहे.



