spot_img
spot_img

जलजीवन मिशनच्या पाणी योजनेसाठी खोदलेले रस्ते ठेकेदारांकडून पूर्ववत करून घ्यावेत आ. कानडे यांची पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी   

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर  विधानसभा मतदार संघात सुरु असलेल्या जलजीवन मिशनच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी रस्ते खोदल्याने रस्त्यांची वाताहत झाली आहे. याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी येत असून सदरचे रस्ते संबंधित ठेकेदाराकडून पूर्ववत करण्यात यावेत, तसे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात यावेत, अशी मागणी आ. कानडे यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.  

आ. कानडे यांनी पत्रात म्हटले आहे कि, जलजीवन मिशन अंतर्गत श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत हद्दीमध्ये पाणी पुरवठा योजनाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी उद्भवापासून मुख्य जलवाहनी व साठवण टाकीपासून पाणी वितरकासाठीच्या शेकडो किलोमीटर जलवाहिन्याचे खोदकाम सुरु आहे. वास्तविक उद्भवाचे काम पूर्ण झाल्याशिवाय जलवाहिन्या व वितरकांची कामे हाती घेऊ नयेत, असे शासन निर्णयात नमूद आहे. तरी देखील सर्वात आगोदर खरेदी केलेले योजनेसाठीचे पाईप कसे तरी करून जमिनीत गाडण्याचे व त्याद्वारे बिले काढून पैसे कमावण्याचे काम अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदार करीत आहेत. यामुळे ग्रामपंचायतींची गाव अंतर्गत मोठ्या कष्टाने केलेले रस्ते खोदले जात आहेत. अनेक ठिकाणी सदरचे खड्डे काळी माती टाकून भरले जात आहेत.

ग्रामपंचायतींना वित्त आयोग, दलित वस्ती सुधार योजना, स्वनिधी अथवा स्थानिक विकास निधी यापासून फार थोड्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असतो. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेच्या खोदकामामुळे नादुरुस्त झालेले रस्ते पुन्हा दुरुस्त करून घेणे ग्रामपंचायतींना शक्य नाही. म्हणून योजनेच्या ठेकेदारानेच ते रस्ते तात्काळ दुरुस्त करून देण्याची आवश्यकता आहे.

अशाच प्रकारे उद्भावापासून मुख्य जलवाहिन्या टाकत असताना ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा मार्ग, यांच्या कडेने रस्त्याला चिकटून खोदकाम केले जात आहे. त्यामुळे या रस्त्याच्या साईड गटारी, साईडपट्ट्या बेदरकारपणे खोदल्या जात आहेत. यामुळे रस्ते दुरुस्तीसाठी मतदार संघातील बांधलेले रस्ते पुन्हा खोदले जाऊ लागले आहेत. या पाणी पुरवठा योजनेच्या खोदकामामुळे नादुरुस्त झालेले रस्तेदेखील ठेकेदाराने त्याच्या निधीतून दुरुस्त करून पूर्ववत करून देण्याची आवश्यकता आहे.

जलजीवन मिशनचे ठेकेदार अधिकाऱ्यांना हाताशी धरून अतिशय उद्धटपणे तालुक्यातील रस्ते व गाव अंतर्गत रस्ते यांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे गावागावात असंतोष निर्माण झाला आहे. मतदार संघातील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्रेक निर्माण होऊ नये म्हणून खोदलेले रस्ते स्वखर्चाने ठेकेदाराकडून पूर्ववत करून घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी आ. कानडे यांनी पत्राद्वारे केली आहे.

निवेदनाच्या प्रती पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे आयुक्त, विभागीय आयुक्त, जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कार्यकारी अभियंता यांना पाठविण्यात आल्या आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!