लोणी दि.६ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-जलजीवन मिशन योजनेचे काम पूर्ण करताना अजूनही गावपातळीवर समन्वयचा अभाव असल्याने कामातील त्रृटी दूर होत नसल्याचे दिसत आहे.योजना ही लोकांसाठी असल्याने शासनाच्या निधीचा अपव्यय होणार नाही याचे गांभीर्य घेवून काम पूर्ण करण्यासाठी अधिकार्यांनी तत्परता दाखविण्याचे आवाहन महसूल पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
मंत्री विखे पाटील यांनी राहाता संगमनेर आणि श्रीरामपूर तालुक्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परीषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचा आढावा अधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत घेतला.अतिरीक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर प्रांताधिकारी माणिक आहेर शैलेंद्र हिंगे किरण सावंत पाटील यांच्यासह जीवन प्राधिकरणाचे अधिकारी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे नितीन दिनकर डॉ विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे प्रवरा बँकेचे चेअरमन डॉ भास्करराव खर्डे पाटील सभापती ज्ञानेश्वर गोंदकर दिपक पठारे व्हा चेअरमन मच्छिंद्र थेटे सतिष ससाणे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
दोन महीन्यापुर्वी सर्व योजनांचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला होता.या बैठकीत योजनेच्या कामातील चुकांमध्ये तातडीने सुधारणा कराव्यात आशा सूचना दिल्या होत्या.आजच्या बैठकीत मंत्री विखे यांनी यामध्ये झालेल्या दुरूस्तीचा आढावा घेवून यामध्ये बदल न केलेल्या अधिकारी तलाठी ग्रामसेवक तसेच ठेकेदार यांच्याकडून आढावा घेवून पुन्हा एकत्रितपणे योजनेच्या कामातील चुका दुरूस्त करण्याचे आदेश दिले.
याप्रसंगी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की योजनेच्या कामाचा आढावा सातत्याने आपण घेत आहोत.परंतू काम सुरू असलेल्या गावात समन्वयाचा अभाव मोठा दिसतो.ठेकेदारांनी मनमानी करभार न करता गावातील प्रमुख पदाधिकारी व लोकांना विश्वासात घेवून काम करायचे आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनांची काम सुरू आहेत.त्यामुळे कोणा एकाच्या मालकीची योजना नाही.त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी जशी सरकारी यंत्रणेची आहे तशीच पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने गावातील कार्यकर्त्यांनी केवळ तक्रारी न करता योजनेचे काम कसे चांगल्या पध्दतीने पूर्ण होईल याचा प्रयत्न करावा.कामात चुका जरूर दाखवा पण योजनेचे कामच ठप्प होईल आशी भूमिका न घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून महत्त्वपूर्ण आशी योजना आपल्या सर्वना मिळाली आहे.२०२४ पर्यत या योजनेचे उद्दीष्ट आपल्याला पूर्ण करायचे आहे.त्यामुळे काम पूर्ण करण्याचा कलावधी लक्षात घेवून योजनेचे काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकारी कर्मचारी यांना दिल्या.
पुढील अनेक वर्षांचा पाणी प्रश्न या योजनेतून सुटणार आहे.त्यामुळे कामातील त्रृटी आताच दूर करणे महत्वाचे ठरेल, कामातील चुका दुरूस्त न झाल्यास आणि पाण्याची उपलब्धता होवू न शकल्यास निधीचा अपव्यय होईल हे गांभीर्य लक्षात घेवून योजनेच्या कामासाठी तालुका स्तरावर तहसिलदार गटविकास अधिकारी यांनी दर आठ दिवसाला एकत्रिपणे कामचा आढावा घेण्याचे त्यांनी सूचित केले.



