लोणी दि.७( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी (डी व बी फार्म) चिंचोली-मोहु तालुका सिन्नर जिल्हा नाशिक व सिंधुताई विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल चिंचोली यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत ब्राह्मणवाडे तालुका सिन्नर येथे मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचे व औषधे वाटपाचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती प्राचार्य डॉ. विजय तांबे यांनी दिली.
राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम महाविद्यालयाचे वतीने राबविण्यात आला. आरोग्य शिबिरा दरम्यान गावातील नागरिकांना विविध आजार आणि त्याचे उपचार याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थांची तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. संबंधित रुग्णांना उपचारासाठी मोफत गोळ्या औषधांचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांकडून उपस्थित रुग्णांचे आरोग्य समुपदेशन करण्यात आले. महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. रिनल पानगव्हाणे प्रा. धीरज चेचरे, प्रा. गायत्री म्हस्के तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.



