राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-मराठा आरक्षण व सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत दिली आहे. सरकारने तोपर्यंत कुठलीही हालचाल केली नाही तर सरकारला पुन्हा जाग करण्यासाठी येत्या १४ ऑक्टोबरला अंतरवाली सराटीत मराठा समाजाचा महामेळावा आयोजित केला असून यासाठी सर्व मराठा बांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील राज्याच्या विविध भागात भेटी देऊन मराठा बांधवाशी संवाद साधत आहे. जरांगे पाटील राहुरीत आल्यानंतर सकल मराठा बांधवांच्यावतीने ढोल ताशा गजरात व डीजेच्या निनादात व जेसीबीच्या सहाय्याने पुष्यवृष्टि करत स्वागत केले.
नगर-मनमाड मार्गावरील विठ्ठला लॉन्स येथे उपस्थित हजारो मराठा बांधवाना मनोज जरांगे पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, मी मागे हटणारा किंवा मॅनेज होणारा कार्यकर्ता नाही.मराठा आरक्षण मिळवण्यासाठी सर्वानी शांततेच्या मार्गाने आंदोलन करायच असून कोणीही जाळ-पोळ सारख कृत्य करू नका, एकही मराठा समाजाच्या तरुणाने आरक्षणासाठी आत्महत्या करू नका अशी विनंती केली.
उपोषण सोडतेवेळी सरकारने ४० दिवसाचा अवधी दिला होता.. आता तो अवधी संपत असून १४ ऑक्टोबरला अंतरवलीत मराठ्यांची महासभा होत असून यासाठी सर्वानी अंतरवली सराठीत या असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मोठ्या संख्यने मराठा समाज बांधव उपस्थित होते.



