कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- मराठा समाज नुसता जागाच झाला नाही तर तो आरक्षणविषयीच्या वेदना घेऊन रस्त्यावर उतरला आहे. अहमदनगर जिल्हाच नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील सर्वसामान्य मराठा समाज आंदोलनात उतरला आहे आणि हे आंदोलन कोणीही मोडून काढू शकत नाही. ओबीसी बांधव आणि मराठा बांधव एकत्र आहेत. त्यांच्या मनात थोडासा गैरसमज आहे, तोही लवकरच दूर होईल व तो समाज आमच्यासोबत आलेला पाहायला मिळेल असा आत्मविश्वास मराठा समाजाचे संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
मनोज जरांगे पाटील यांचे कोल्हार भगवतीपूर येथे फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. ते राहात्याकडे सभेसाठी जात असतांना ग्रामस्थांच्या विनंतीवरून ते थोडा वेळ थांबले. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने कोल्हार बुद्रुकचे सरपंच ॲड . सुरेंद्र खर्डे, कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे, जितेंद्र खर्डे, सुरेश पानसरे तर सकल मराठा समाजाच्यावतीने आशुतोष बोरसे, सुजित खळदकर यांनी श्री. जरांगे यांचा सत्कार केला.
स्वागत व सत्काराचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कोल्हार भगवतीपूर सकल मराठा समाजाच्यावतीने आशुतोष बोरसे, सुजित खळदकर, अमोल खर्डे, अजिंक्य भगत, प्रा. नवनाथ शिंदे, विजय डेंगळे, प्रदीप खर्डे, अक्षय मोरे, गणेश सोमवंशी, संकेत कापसे, आसिफ शेख, धनंजय निबे, दिपक राऊत, राहुल निबे आदी प्रयत्नशील होते.



