श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ):- जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात अशी कुठली शेती पिकवली जाते की त्यांना शेतीसाठी ७-८ आवर्तने लागतात. केवळ कायदा आपल्या बाजुने आहे, पाणी येऊ शकते म्हणून जायकवाडीच्या लाभक्षेत्रात पाण्याची उधळपट्टी होत असल्याचा आरोप भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीचे अध्यक्ष सुरेश ताके यांनी केला आहे.
येत्या ११ तारखेला श्रीरामपूर बाजार समितीच्या आवारात भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीच्या वतीने आयोजित पाणी परिषदेच्या नियोजनासाठी आज विश्रामगृहात बैठक झाली.या बैठकीत जायकवाडीला पाणी जाण्याबाबत सर्वांनी अतिशय तिव्र मते मांडली.त्यावेळी ताके बोलत होते.भंडारदरा व दारणा धरणाचे लाभक्षेत्र हे १०० वर्षांपासून बारमाही पिकपध्दतीचे असताना तेथे ४ ते ५ सिंचन आवर्तनात शेतकरी शेती करतात.मुळा धरणाचे जेमतेम ३ आवर्तने होतात. तरीही तेथील शेतकरी शेती करतात. परंतु जायकवाडी लाभक्षेत्रात शेतीसाठी ७-८ आवर्तने लागतात.या उधळपट्टीला चाप लावण्यासाठी मा.उच्च न्यायालयाचेे न्यायपत्राचा सन्मान करुन पाणी थांबवण्यासाठी ही पाणी परिषद महत्वाची असल्याचे त्यांनी नमुद केले.येत्या १० तारखेला निळवंडे लाभक्षेत्रासाठी आवर्तन सुटणार आहे. त्यामुळे भंडारदरा लाभक्षेत्रात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवणार असल्याने पाणी परिषद घेऊन लाभक्षेत्रासाठी काही महत्त्वाचे ठराव करणे गरजेचे असल्याचे पाणी परिषदेचे स्वागताध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी सांगितले.
जायकवाडीला पाणी गेल्यानंतर वाड्यावस्त्यांवर प्यायला पाणी राहणार नाही.तसेच भंडारदरा लाभक्षेत्रातील जनतेचा जिवनमरणाचा प्रश्न तयार होऊ शकतो या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय पाणीपरिषद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी सर्वांनी घेतली. श्रीरामपूर व आजुबाजुला असलेल्या तालुक्यांत सर्वात निचांकी पाऊस पडलेला असताना जायकवाडीला पाणी गेल्यास जानेवारी महिन्यातच पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष्य भंडारदरा लाभक्षेत्रात जाणवणार असल्याचे सर्वांनी मांडले.या बैठकीला सेवानिवृत्त पाटबंधारे अधिकारी सुभाष फरगडे ,कृष्णा शिंदे,ॲड. विजयजी साळुंके,भागचंद औताडे ,सभापती सुधीर नवले,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम झंवर,संजय छल्लारे,चेतन औताडे,निलेश शेडगे,शांतीलालसेठ हिरण,प्रशांत लढ्ढा,अभिजित लिप्टे,बापूसाहेब शेरकर,युवराज जगताप,नितीन पटारे,सुभाष त्रिभुवन,किशोर पाटील, कैलास बोर्डे,भरत आसने,रामचंद्र पटारे,दत्तात्रय लिप्टे आदींसह शेतकरी उपस्थित होते.



