अशोकनगर( जनता आवाज वृत्तसेवा): – टपाल सेवेने गावांपासून शहरांपर्यंत सर्वाना एकमेकांशी जोडले आहे. टपाल सेवा ही माहितीची, संदेशांची देवाणघेवाण करण्याची सर्वात जुनी, सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा आहे. टेलिफोन आणि मोबाईल अस्तित्वात येण्याच्या आधीपासून टपाल सेवा अस्तित्वात आहे. येत्या काळातही पोस्ट सर्वोत्तम सेवा देण्यास सज्ज राहील, असा विश्वास सौ.मंजुश्री मुरकुटे यांनी व्यक्त केला.
जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून श्रीरामपूर डाक विभागांतर्गत अशोकनगर येथे मसाला मेकिंग कोर्सच्या ठिकाणी “बचत कशी करावी आणि बचतीचे महत्त्व” या विषयावर जिद्द सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.मंजुश्री मुरकुटे तसेच श्रीरामपूर डाक विभागाचे विकास अधिकारी विजय कोल्हे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
श्री.कोल्हे यांनी सांगितले की, भारतीय डाक विभाग आता फक्त पत्र पाठविण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील आधार संलग्न भुगतान सेवा (एईपीएस) मार्फत ग्राहक पोस्टाशी जोडले जात आहेत. कोरोना महामारीच्या काळातही ग्राहकांनी पोस्टाच्या विविध सेवांचा लाभ घेतला. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमध्ये पोस्टाच्या माध्यमातून इतर बँकेने आपल्या खात्यातून उलाढाल केली. आजही जगातील ७० ते ८० टक्के नागरिकांचा टपाल सेवेशी संबंध येतो. आता संपर्काचे आणि माहितीची देवाणघेवाण करण्याचे अनेक वेगवान आणि प्रभावी पर्याय उपलब्ध आहेत. हे पर्याय उपलब्ध असूनही टपाल सेवेची गरज संपलेली नाही. जगभरातील हजारो नागरिक आजही कमी जास्त प्रमाणात टपाल सेवेवर अवलंबून आहेत. हजारो संस्था अधिकृत पत्रव्यवहार करण्यासाठी आजही टपाल सेवेचा विश्वासार्ह म्हणून वापर करत आहेत. कोणी टपाल सेवेच्या होम डिलिव्हरीचा लाभ घेते, तर कोणी टपाल सेवेच्या ऑनलाइन सर्व्हिसेसचा उपयोग करून घेते. तसेच ग्रामीण भागातील महिलांमध्ये वित्तीय साक्षरता आणून त्यांचे जीवन आर्थिक दृष्ट्या समृद्ध आणि सुरक्षित करण्यासाठी महिला सन्मान बचत पत्राद्वारे भारत सरकार कडून कमी व्याजदराने ठेवीची सुविधा दिली जाते. तसेच ग्रामीण डाक जीवन विमा पॉलिसी, मासिक प्राप्ती योजना, किसान विकास पत्र, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना आदीची माहिती श्री. कोल्हे यांनी दिली.
तसेच सौ.मुरकुटे यांनी ग्रामीण भागातील महिलांसाठी नवीन उद्योग सुरू करण्याचे प्रशिक्षणाच्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्याबद्दल महिलांनी आभार व्यक्त केले. या २० दिवसाच्या प्रशिक्षणामुळे महिलांना आत्मविश्वास व ध्येय निर्माण झाले. तसेच मसाला मेकिंग कोर्स मध्ये दररोज शिकविल्या जाणाऱ्या मसाल्याचे पदार्थ बनवून त्याचे सादरीकरण केले जाते.
याप्रसंगी सेजल उद्योग समूहाचे संस्थापक जितेंद्र तोरणे, ट्रेनर विद्याताई क्षीरसागर यांनी देखील मार्गदर्शन केले. तसेच राजश्रीताई शहाणे, साक्षीताई आगडे, रंजनाताई देठे, गिताताई बारगजे आदीं महिलांनी आपले मनोगत व्यक्त करीत या कोर्सचे आयोजन केल्याबद्दल सौ.मंजुश्री मुरकुटे यांचे आभार मानले.




