राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा):-बचत गटातील महिला व अधिकाऱ्यांची लवकरच बैठक लावून वरिष्ठ पातळीवरून बचत गटातील महिलांना मदत मिळवून देईल. अशी ग्वाही आमदार प्राजक्त तनपूरे यांनी दिली. राहुरी येथे आज दिनांक ११ ऑक्टोबर २०२३ रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ अहमदनगर, दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान व प्रतिभा लोकसंचलीत साधन केंद्र राहुरी यांची १२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून आमदार तनपूरे बोलत होते.
राहुरी शहरातील केशररंग मंगल कार्यालय या ठिकाणी ही १२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर माजी उप नगराध्यक्ष सुर्यकांत भुजाडी, शहाजी ठाकूर, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, पुष्पा धनवटे, संजय गर्जे, महेश आबुज आदि उपस्थित होते.
आमदार प्राजक्त तनपूरे पुढे म्हणाले कि, बचत गटाच्या माध्यमातून घेतलेले कर्ज महिलांकडून १०० टक्के फेडले जाते. प्रतिभा लोकसंचलीत साधन केंद्र राहुरी यांचे बचत गटाच्या माध्यमातून उत्कृष्ट कामकाज सुरु आहे. या संस्थेची भवीष्यात कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल असेल. फक्त संस्था व महिलांमध्ये राजकारण आणू नये. असा हास्यास्पद टोळा तनपूरे यांनी लावला. बचत गटातील महिलांच्या हाथाला रोजगार मिळेल, अशी कामे संस्थेच्या माध्यमातून होतील. अशी खात्री यावेळी आमदार प्राजक्त तनपूरे यांनी व्यक्त केली. महिलांना रोजगार मिळाला व महिला सबलीकरण व्हावे. यासाठी मी नेहमी तत्पर आहे. त्यासाठी बचत गटातील महिला व अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेऊन वरिष्ठ पातळीवरून मदत मिळवून देईल. असे आश्वासन आमदार तनपूरे यांनी दिले.
यावेळी संजय गर्जे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शेळी पालन, दुग्ध व्यवसाय आदि शेतीविषयक व्यवसायाला प्राधान्य देण्याचे महिलांना आवाहन केले. तसेच महेश आबुज यांनी सन २०२२-२०२३ मध्ये बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी स्टाॅल वितरण, चुल वाटप तसेच बचत गटाला मदत करणाऱ्या पुरुषांचा सन्मान सोहळा आदि केलेल्या कामांची थोडक्यात माहिती दिली.
या प्रसंगी अनेक महिला बचत गटांना आमदार प्राजक्त तनपूरे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. उत्कृष्ट काम करणाऱ्या बचत गटातील महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शहर व तालुक्यात कार्यरत असलेल्या बचत गटातील हजारो महिला उपस्थित होत्या.